Bondi Beach Attack: सिडनीतील प्रसिद्ध बाँडी बीचवर घडलेल्या भीषण हल्ल्याच्या तपासात नवनवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या प्रकरणात 15 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेले 50 वर्षीय साजिद अक्रम आणि त्याचा 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम यांनी हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी फिलिपिन्सचा दौरा केल्याची माहिती उघड झाली आहे. फिलिपिन्सच्या इमिग्रेशन विभागाने ही बाब अधिकृतरीत्या स्पष्ट केली आहे. फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील रहिवासी असलेल्या या दोघांनी भारतीय पासपोर्टचा वापर करून 1 नोव्हेंबर रोजी फिलिपिन्समध्ये प्रवेश केला होता. जवळपास महिनाभर तेथे मुक्काम केल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी ते परतले. सिडनीला जाण्यापूर्वी त्यांनी दावो शहर हे अंतिम ठिकाण असल्याचे नमूद केले होते आणि दावो-मनिला मार्गे कनेक्टिंग फ्लाइटने तेथून देश सोडला होता.
या दौऱ्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सध्या फिलिपिन्स तसेच ऑस्ट्रेलियातील यंत्रणांकडून सुरू आहे. यापूर्वी स्थानिक माध्यमांनी सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने असा दावा केला होता की, हल्ल्याच्या आधी या दोघांनी कथितपणे लष्करी पद्धतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी फिलिपिन्सला प्रवास केला असावा. दरम्यान, तपासादरम्यान नवीद अक्रमच्या नावावर नोंदणीकृत वाहनातून सुधारित स्फोटक उपकरणे (IED) आणि आयएसआयएसशी संबंधित दोन झेंडे सापडल्याचे न्यू साउथ वेल्स (NSW) पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आयएसआयएस ही संघटना ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.
हेही वाचा – Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प BBC विरोधात आक्रमक, ठोकला मानहानीचा दावा, नेमकं प्रकरण काय?
पोलीस तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला असून, संशयितांनी कुटुंबीयांना वीकेंडला मासेमारीसाठी जात असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र ते सिडनीतील कॅम्पसी परिसरातील अल्पकालीन भाड्याच्या घरात राहत होते, जिथे हल्ल्याची आखणी केल्याचा संशय आहे. दहशतवादविरोधी पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून दोन अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. एनएसडब्ल्यूचे पोलीस आयुक्त माल लॅन्यॉन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या प्रवासादरम्यान कोणताही ठोस सुरक्षा इशारा मिळाल्याचे संकेत नाहीत. हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश होते, असे मला वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हल्ल्याचा मुख्य उद्देश देशातील ज्यू समुदायामध्ये भीती निर्माण करणे हा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – Prada Launch Kolhapur Sandles : 'प्राडा'ची मेड इन इंडिया कोल्हापुरी चप्पल लॉन्च, किंमत ऐकून थक्क व्हाल
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पहिल्यांदाच दोन्ही आरोपी द्वेषमूलक विचारसरणीमुळे कट्टरपंथी बनल्याचे संकेत दिले. हा हल्ला इस्लामिक स्टेटच्या विचारधारेने प्रेरित असल्याचे दिसते, असे त्यांनी म्हटले. नवीद अक्रमकडे 2019 मध्ये गुप्तचर यंत्रणांचे लक्ष गेले होते, मात्र त्यावेळी तो तात्काळ धोका ठरेल, असे वाटले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तथापी, 1998 मध्ये विद्यार्थी व्हिसावर ऑस्ट्रेलियात आलेला साजिद अक्रम नंतर रेसिडेंट रिटर्न व्हिसावर राहत होता. तो फळविक्रेता होता आणि त्याच्याकडे वैध शिकारीचा अग्निशस्त्र परवाना होता. त्याच्या मालकीची सहा शस्त्रे कायदेशीर होती, त्यापैकी काही हल्ल्याच्या ठिकाणी नेण्यात आली होती. पोलीस कारवाईदरम्यान साजिद अक्रमला घटनास्थळीच गोळ्या घालून ठार करण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.