ऑस्ट्रेलिया: पर्थ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात पॅट कमिन्स आणि जॉश हेझलवूड नव्हते. त्यामुळे गोलंदाजीची संपूर्ण जबाबदारी मिचेल स्टार्क याच्या खांद्यावर होती. स्टार्कने ही जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडत इंग्लंडच्या फलंदाजीला अक्षरशः खिळखिळे केले. त्याने एकहाती सात विकेट घेत इंग्लंडचा संपूर्ण डाव उद्ध्वस्त केला. याशिवाय त्याच्या 14 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये एका डावात सात विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पहिल्या सेशनमध्ये मिचेल स्टार्कने सुरुवातीपासूनच इंग्लंडला धक्के दिले. पहिल्या स्पेलमध्ये त्याने सहा ओव्हरमध्ये 17 धावा देत तीन विकेट घेतल्या. यात इंग्लंडचे ओपनर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांना त्याने शून्यावर बाद केले. याशिवाय अनुभवी जो रूट यांनाही स्टार्कने पहिल्याच स्पेलमध्ये माघारी धाडले. हे तिघे साधे खातेही उघडू शकले नाही.
हेही वाचा: Shubman Gill Health Update: टीम इंडियाला मोठा धक्का! शुभमन गिल गुवाहाटी कसोटीतून बाहेर
दुसऱ्या सेशनमध्ये स्टार्कचा आणखी अचूक मारा
दुसऱ्या सेशनमध्ये स्टार्कने इंग्लंडला पुन्हा एकदा धक्के दिले. त्यानी इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्स, त्यानंतर गस अॅटकिंसन, नंतर जेमी स्मिथ आणि शेवटी मार्क वुड यांना बाद केले. या चार महत्त्वाच्या विकेट्समुळे इंग्लंडचा पहिला डाव संपला.
14 वर्षांच्या करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी
या डावात मिचेल स्टार्कने 12.5 ओव्हरमध्ये 58 धावा देत सात विकेट घेतल्या. 2011 मध्ये टेस्ट पदार्पण केल्यानंतर एका डावात सात विकेट घेण्याचा हा त्याचा पहिलाच पराक्रम ठरला. याआधी त्यांची सर्वोत्तम कामगिरी सहा विकेटची होती. स्टार्कने आता टेस्ट क्रिकेटमध्ये 17 वेळा पाच किंवा अधिक विकेट घेतल्या असून इंग्लंडविरुद्ध ही त्याची पाचवी विक्रमी कामगिरी आहे. स्टार्कच्या या तडाखेबाज गोलंदाजीमुळे पर्थ टेस्टमध्ये इंग्लंडवर मोठे दडपण आले असून सामना एकतर्फी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.