ICC ODI World Cup 2027: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आगामी 2027 वनडे वर्ल्ड कपची (पुरुष) सुरुवात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी करण्याच्या विचारात आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली हा क्रिकेटचा महाकुंभ रंगणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यातील 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत व्यतीत केली होती. त्यामुळे शांतता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या या महान नेत्याला क्रिकेटच्या जागतिक मंचावरून अभिवादन करण्यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकात बदल; 21 नोव्हेंबरला रंगणार अंतिम सामना
यापूर्वीच्या नियोजनानुसार वर्ल्ड कप 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार होता आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सराव सामने खेळवले जाणार होते. परंतु, नवीन प्रस्तावानुसार आता सराव सामने सप्टेंबरच्या शेवटी हलवून मुख्य स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन 2 ऑक्टोबर रोजी केले जाण्याची शक्यता आहे. तब्बल 50 दिवस चालणाऱ्या या महासंग्रामाचा अंतिम सामना 21 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. जगभरात वाढत्या तणावाच्या आणि ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर बापूजींच्या जन्मदिनी स्पर्धेची सुरुवात होणे हा एक मोठा आणि अतिशय महत्त्वाचा जागतिक संदेश मानला जात आहे.
3 देशांमधील 12 मैदानांवर रंगणार क्रिकेटचा थरार
या भव्य 14 देशांच्या स्पर्धेसाठी 3 यजमान देशांमधील एकूण 12 स्टेडियम्सची निवड करण्यात आली आहे. यातील बहुतांश सामने दक्षिण आफ्रिकेतील 8 मैदानांवर पार पडतील, ज्यामध्ये जोहान्सबर्गचे वॉंडरर्स, श्वाने (प्रिटोरिया) चे सेंच्युरियन, केपटाऊनचे न्यूलँड्स, डर्बनचे किंग्समीड, गेकेबरहाचे सेंट जॉर्ज पार्क, ब्लोमफॉन्टेनचे मंगाउंग ओव्हल, पार्लचे बोलँड पार्क आणि कुगोम्पो शहराचे (पूर्वीचे ईस्ट लंडन) बफेलो पार्क यांचा समावेश आहे.
झिम्बाब्वे आणि नामिबियातील मैदानांची घोषणा
दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त झिम्बाब्वेमधील 3 प्रमुख मैदानांवर सामने आयोजित केले जातील. यामध्ये हरारे स्पोर्ट्स क्लब, बुलवायोचे क्विन्स स्पोर्ट्स क्लब आणि व्हिक्टोरिया फॉल्सजवळील नवनिर्मित मोसी-ओ-तुन्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा समावेश आहे. याशिवाय तिसरा यजमान देश असलेल्या नामिबियाच्या विंडहोक या राजधानीच्या शहरातील ‘नामिबिया क्रिकेट ग्राऊंड’वरही या स्पर्धेतील काही सामने खेळवले जाणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.