राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.
क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक समीर वानखेडेंवर गेल्या महिनाभर आरोप करत आहेत. मात्र वानखेडे कुटुंबियांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तरीही मलिक दररोज नवा आरोप वानखेडे कुटुंबावर करत आहेत. त्यामुळे याप्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
मलिक दररोज नवा आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आमच्या विरोधात अनेक पोस्ट केल्या जात असून आम्हाला अनेक धमक्याही येत आहेत. या सर्व गोष्टींचा आम्हाला त्रास होत आहे. असे ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या दाव्यावर मलिकांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.
क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. वानखेडे खोटी प्रकरणे उभे करून खंडणी वसुल करतात. तसेच निर्दोष व्यक्तींना खोट्या आरोपाखाली अटक करतात. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असून समीर वानखेडे मुस्लिम असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मलिकांनी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला, निकाहचे फोटोही सादर केले. खोटे जातप्रमाणपत्र सादर करून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी पत्नी क्रांती रेडकर आणि आज समीर वानखेडेंची मेहुणी आणि क्रांती रेडकरची बहिण हर्षदा रेडकरविरोधात ही आरोप केला आहेत. त्यामुळे अशा सततच्या आरोपांमुळे संतप्त समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.