Brydon Carse and Ben Stokes Night Club VIDEO: इंग्लंड क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा खेळाडूंच्या मैदानाबाहेरील वर्तनामुळे मोठा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. डर्बी शहरातील एका नाईटक्लबबाहेर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पोलीस कार्सच्या हातात बेड्या घालत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) तात्काळ अंतर्गत चौकशी सुरू केल्याचे जाहीर केले आहे.
सहकारी खेळाडूशी संवाद आणि बेन स्टोक्सची घटनास्थळावरून काढता पाय
एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनुसार, बेड्या ठोकलेल्या अवस्थेत कार्स त्याचा डरहम संघातील सहकारी खेळाडू मॅथ्यू पॉट्स याच्याशी चर्चा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स देखील याच व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये उपस्थित असल्याचे दिसून आले. मात्र, वाद वाढल्याचे लक्षात येताच बेन स्टोक्सने मागच्या मागे हळूच काढता पाय घेतला. डरहम संघाने शनिवारी डर्बीशायरविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर सर्व खेळाडू सेलिब्रेशन करण्यासाठी या नाईटक्लबमध्ये एकत्र आले होते.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पाकिस्तानविरुद्धच्या आगामी पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी ब्रायडन कार्सची इंग्लंडच्या संघात निवड झाली आहे. पहिल्या कसोटीपूर्वी त्याला काउंटी चॅम्पियनशिप खेळण्यासाठी डरहम संघात सोडण्यात आले होते. या घटनेमुळे इंग्लंडच्या राष्ट्रीय खेळाडूंच्या मैदानाबाहेरील बेशिस्त वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
यापूर्वीच्या दौऱ्यांमध्येही दारू आणि नाईटक्लब वादांचे सत्र
इंग्लंडच्या खेळाडूंचे नाईटक्लब आणि दारूशी संबंधित वाद पहिल्यांदाच समोर आलेले नाहीत. याआधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानही इंग्लिश खेळाडूंच्या अति-मद्यपानावर तीव्र टीका झाली होती. खराब ॲशेस मालिकेदरम्यान खेळाडू मद्यधुंद अवस्थेत असल्याच्या चित्रफिती समोर आल्या होत्या. तसेच न्यूझीलंड दौऱ्यात मर्यादित षटकांचा कर्णधार हॅरी ब्रूक हादेखील एका नाईटक्लब वादात अडकला होता, ज्यानंतर बोर्डाकडून त्याला कडक समज देण्यात आली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.