West Indies Players Stuck in india : T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू गेल्या 5 ते 7 दिवसांपासून भारतात अडकून पडले आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्य-पूर्वेतील अनेक देशांनी आपले एअरस्पेस बंद केले असून, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्णपणे विसकळीत झाली आहे. यामुळे शिमरॉन हेटमायर आणि अकील हुसैन यांसारख्या खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी तिकीट मिळवणे कठीण झाले असून, भारतातच ताटकळत राहावे लागत आहे. यामुळे खेळाडू कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
हेटमायर रडकुंडीला अन् अकील हुसैनला रोनाल्डोची आठवण
मायदेशी परतण्यास विलंब होत असल्याने वेस्ट इंडिजचे खेळाडू आता सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. शिमरॉन हेटमायर अक्षरशः रडकुंडीला आला असून त्याने "मला घरी जायचंय" अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. दुसरीकडे, अकील हुसैन याने हताश होऊन एक मोठी पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्याने फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव घेतले आहे. "या कठीण परिस्थितीतून मला आता फक्त रोनाल्डोच वाचवू शकतो," असे त्याने उपरोधिकपणे म्हटले असून, या खेळाडूंनी मदतीसाठी आता जागतिक स्तरावर साकडं घातलं आहे का, अशी चर्चा रंगली आहे.
आयसीसी आणि बीसीसीआयची धावपळ; चार्टर फ्लाईटचे नियोजन
खेळाडूंची वाढती अस्वस्थता पाहून आयसीसी (ICC) आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत खेळाडूंच्या सुरक्षिततेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बीसीसीआयने (BCCI) सध्या या सर्व खेळाडूंच्या राहण्याची आणि सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने चाहत्यांना आश्वस्त केले आहे की, खेळाडूंना सुरक्षितपणे मायदेशी नेण्यासाठी एका विशेष चार्टर फ्लाईटची (Charter Flight) व्यवस्था केली जात आहे, जेणेकरून युद्धग्रस्त एअरस्पेस टाळून त्यांना घरी पोहोचवता येईल.
पुढील 24 तासांत खेळाडू होणार रवाना
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, सर्व तांत्रिक बाबी आणि आंतरराष्ट्रीय विमान नियमांचे पालन करून खेळाडूंना मायदेशी पाठवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुढील 24 तासांत वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ भारतातून रवाना होण्याची दाट शक्यता आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे जरी हे खेळाडू 7 दिवसांपासून अडकले असले, तरी ते भारतात पूर्णपणे सुरक्षित आहेत. आता चार्टर विमानाद्वारे त्यांचा हा वनवास संपणार असून, विंडीजचे खेळाडू लवकरच आपल्या कुटुंबात परतणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.