मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या राजकीय पटलावर आज एक नवीन इतिहास लिहिला गेला आहे. मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून, मुंबई महापालिकेतून प्रशासक राजवट संपुष्टात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विशेष म्हणजे, विरोधी बाकांवरील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे कोणताही विरोध नसल्याने ही निवडणूक 'बिनविरोध' पार पडली आणि मुंबईत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचे अर्थात 'मेयर राज' सुरू झाले.
महायुतीने मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत सिद्ध करत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. घाटकोपरच्या नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलेल्या रितू तावडे यांच्या रूपाने मुंबईला भाजपचा दुसरा महापौर मिळाला आहे. यापूर्वी 1982 मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे पहिले महापौर होते. त्यानंतर तब्बल चार दशकांनंतर हा बहुमान भाजपला मिळाला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुंबईतील 'पहिल्या महिला महापौर' होण्याचा मान रितू तावडे यांनी पटकावला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारताच महापालिकेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा: Bank Strike News: मोठी बातमी, अन्यथा होईल मनस्ताप! बँकेचे काम उद्यावर ढकलताय; कारण काय ?
यंदाच्या महापौर निवडणुकीत नियमावलीतील बदल हा कळीचा मुद्दा ठरला. जुन्या प्रथेनुसार मावळते महापौर किंवा सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत असत. जुन्या नियमानुसार ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना हा अधिकार मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे नियम बदलून पीठासीन अधिकारी म्हणून प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्यानुसार, सध्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. संभाव्य राजकीय पेच टाळण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हा बदल केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दुसरीकडे, या निवडीमुळे मुंबई महापालिकेवरील उद्धव ठाकरे गटाची तब्बल 24 वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. गेली अडीच दशके मुंबई महापालिका हा ठाकरे गटाचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणात आणि संख्याबळाच्या खेळात ठाकरे गटाला सत्ता गमवावी लागली आहे. संख्याबळ नसल्याने विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतल्याने, सत्तांतराची ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध असली तरी राजकीयदृष्ट्या ती अत्यंत धक्कादायक ठरली आहे.
या ऐतिहासिक निवडीच्या वेळी मुंबई महापालिका मुख्यालय परिसरात प्रचंड तणाव आणि उत्साहाचे संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत एन्ट्री करताच भाजप कार्यकर्त्यांनी "देवाभाऊ… देवाभाऊ" अशा गगनभेदी घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूंच्या या शक्तिप्रदर्शनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. आता नव्या महापौरांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास रथ कसा पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.