‘बंडखोर पराभूत होतील’

‘बंडखोर पराभूत होतील’

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ३४ आमदार असल्याची माहिती आहे. तसेच शरद पवार यांना १७ आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. सातारा, कराडनंतर आता ते नाशिकमध्ये दाखल झाले आहे. आज संध्याकाळी ते मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यात जाहीर सभा घेणार आहे. त्यापूर्वी त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाच्या अनेक आरोपांवर भाष्य केलं आहे. भाजपसोबत युती करण्याचा निर्णय कधी झालाच नव्हता, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांच्या दाव्याचं खंडन केलं आहे.

माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, देशात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीने भाजसोबत युती करण्याची निर्णय कधीही झालाच नव्हता. आमच्या ज्या सहकाऱ्यांना सत्ता मिळाली ते सत्तेत गेले असतील तर हरकत नाही. परंतु भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाल्या होत्या, त्यावर निर्णय झाला नव्हता, असा दावा करत शरद पवार यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या आरोपांचं खंडन केलं आहे. तसेच छगन भुजबळ यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली, परंतु आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व बंडखोर आमदारांचा पराभव होणार असल्याचं सांगत शरद पवार यांनी छगन भुजबळांना आव्हान दिलं आहे.

माझं वय झालं आहे, यात काही वाद नाही. परंतु प्रकृती चांगली असली की वय देखील साथ देतं. मोरारजी देसाई यांचं वय झालेलं असतानाही ते पंतप्रधान झाले, त्यांचं काम बघून आम्हालाही प्रेरणा मिळायची, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे आज संध्याकाळी छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. येवला शहर तसेच नाशकात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version