Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 20व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. 9 मार्च 2026 रोजी पक्षाचा वर्धापनदिन साजरा होत असून यानिमित्ताने रायगड किल्ल्यावर जाऊन सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक साक्षीदार असल्यामुळे अशा पवित्र ठिकाणाहून या मोहिमेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. रायगडावर जाऊन प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही मोहीम केवळ मनसे कार्यकर्त्यांसाठी मर्यादित नसून महाराष्ट्रासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. सदस्य नोंदणी प्रक्रिया डिजिटल पद्धतीनेही केली जाणार असून त्याचा सविस्तर तपशील 10 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील शाखांबरोबरच बाजारपेठा, शाळा, मंदिरं, महाविद्यालये, मैदानं आणि बागांमध्ये नोंदणीचे स्टॉल उभारण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण ‘शिवराज्याभिषेकाचा’ साक्षीदार देखील हा किल्लाच.
अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत.
आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.
सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत !
प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा.
तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.
बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच !
स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या !
धन्यवाद !
आपला नम्र
राज ठाकरे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.