पंजाबमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते खुशबाज जटाना यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत त्यांचे चालक परमिंदर यांचाही मृत्यू झाला असून त्यांचा गनमॅन गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे वरील सोनीपतजवळील जखोली टोल प्लाझावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशबाज जटाना हे दिल्लीहून पंजाबकडे परतत असताना त्यांच्या वाहनाला पंचर झाल्याने ते गाडी दुरुस्त करत होते. याच वेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या लँड रोव्हर डिफेंडर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. गंभीर जखमी गनमॅनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी ट्रकची ओळख पटवली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
45 वर्षीय खुशबाज जटाना हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय आणि उदयोन्मुख नेते होते. त्यांनी 2017 आणि 2022 मध्ये पंजाबमधील तलवंडी साबो मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ते काँग्रेसच्या बठिंडा ग्रामीण जिल्हा युनिटचे अध्यक्ष होते.
या दुर्दैवी घटनेनंतर काँग्रेसचे खासदार अमरिंदर सिंह राजा वडिंग आणि इतर नेते सोनीपत सिव्हिल हॉस्पिटल येथे पोहोचले. त्यांनी जटाना यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत, पक्षाने एक ऊर्जावान आणि पुढे येणारा युवा नेता गमावल्याची भावना व्यक्त केली.
या अपघातामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.