पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उघडकीस आणलेल्या मोठ्या घोटाळ्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तब्बल आठ कोटींची लाच मागणाऱ्या दोन व्यक्तींना रंगेहात पकडण्यात आले असून, या कारवाईमुळे सरकारी नोंदणी प्रक्रियेभोवती फिरणारा भ्रष्टाचाराचा अंधार पुन्हा एकदा समोर आला आहे. अटक झालेल्या आरोपींची नावे विनोद देशमुख आणि भास्कर पौळ अशी असून, दोघेही मध्यस्थांच्या नावाखाली सरकारी नोंदी सुधारणेची हमी देत होते.
तक्रारदारांच्या माहितीनुसार, त्यांची 32 गुंठे सोसायटी जमीन पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरात आहे. 2005 नंतर या जमिनीचे नवीन 7/12 उतारे, नकाशे आणि संबंधित दस्तऐवज मिळवण्यासाठी तक्रारदार वारंवार सरकारी कार्यालयात जात होते. मात्र 2020 नंतर त्यांच्या सर्व कामांवर संशयास्पदरीत्या ब्रेक लागला. काही अधिकाऱ्यांमार्फत ‘काम करवून घ्यायचे असेल तर लाच द्यावीच लागेल’ असा दबाव वाढत गेला.
या पार्श्वभूमीवर आरोपींनी तक्रारदारांशी संपर्क साधून थेट आठ कोटींची रक्कम मागितली. इतकेच नव्हे तर या वर्षी त्यांनी तक्रारदारांच्या कुटुंबीयांनाही सातत्याने फोन करून मानसिक त्रास दिला आणि पैशाची मागणी वाढवली. वाढत्या दबावामुळे अखेर तक्रारदारांनी 5 डिसेंबर रोजी Anti-Corruption Bureau (ACB) कडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच ACB ने तत्काळ पडताळणी करून काटेकोर सापळा रचला. आरोपींनी तक्रारदारांना पहिल्या टप्प्यात 30 लाख रुपये आणण्यास सांगितले होते.
ठरलेल्या दिवशी आणि वेळेस तक्रारदार नियोजित ठिकाणी पोहोचले. आरोपी देशमुख आणि पौळ यांनी पैशांचा स्वीकार करताच ACB च्या टीमने त्यांना वेढा घालून त्वरित अटक केली. दोन्ही आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अन्वये लाच मागणे, लाच स्वीकारणे आणि शासकीय प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे या गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई विश्वामनगर पोलिसांच्या सहकार्याने पार पडली. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, शासकीय नोंदी सुधारण्याच्या प्रक्रियेतही भ्रष्टाचाराची जाळी किती खोलवर रुजलेली आहे. ACB च्या या कारवाईमुळे अनेक नागरिकांना आशेची किरण दिसला असून अशा गुन्ह्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.