मुंबई : दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्रित महामोर्चाचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी, 26 जुलै रोजी हा मोर्चा शिवाजी पार्क येथून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. याची माहिती आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे दिली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित होते. हा मोर्चा शांततापूर्वक काढला जाईल, यावेळी कोणत्या पक्षाचा झेंडा नसेल, असेल तो केवळ देशाचा ध्वज, असेही यावेळी राज ठाकरे यांनी नमदू केले. तसेच दिल्लीतील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जसारखा प्रकार येथे झाल्यास आमची माणसंही गप्प बसणार नाहीत, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
गेल्या ३४ दिवसांपासून सीजेपीच्या अंतर्गत देशभरातील युवकांचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रामुख्याने मागणी या आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनातच समाजसेवक सोनम वांगचुक यांनीदेखील उपोषण सुरू केले असून त्याचा आज २३ वा दिवस आहे. ठरल्याप्रमाणे २० जुलै रोजी आंदोलकांनी संसद भवनापर्यंत मोर्चा काढण्यास सुरूवात केली असता त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूधुरांचे नळकांडे फोडले. यादरम्यान, अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटल्याचे दिसून आले. परिणामी, अनेक राजकीय पक्ष या आंदोलनाशी जोडले गेले. विविध राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलन सुरू झाले. त्याप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्रातही आंदोलन पुकारण्यात आले.
दरम्यान, आंदोलनाप्रती सरकारच्या भूमिकेवर राज आणि उद्धव ठाकरे यांनी नाराजी दर्शवत भाजपच्या कार्यकाळातील आंदोलनांची आठवण त्यांना करून दिली. तसेच पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा निषेध करत, असा प्रकार येथे घडल्यास सोडणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.