राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील अंतर्गत घडामोडींना आता नवं वळण मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे पक्षातील नाराजी उफाळून आली. या पत्रामध्ये वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांचा उल्लेख नसल्याने दोन्ही नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत पक्षातील काही घडामोडींसह पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्र पाठवत पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्याची शिफारस केली होती. या पत्रात पार्थ पवार यांना मंत्रीपद का द्यावे, याची आठ कारणे नमूद करण्यात आली होती. मात्र, या पत्रानंतर पक्षात वेगवेगळ्या स्तरावर नाराजी वाढल्याची चर्चा सुरू झाली. याच घडामोडीनंतर पटेल आणि तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात असून, या भेटीत पार्थ पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष किंवा संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांना अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.