सट्ट्यात 60 हजार गमावले; मानसिक तणावात तरुणाची वाशी खाडीत उडी घेऊन आत्महत्या

क्रिकेट सट्ट्यात 60 हजार गमावल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या नवीन पनवेलमधील तरुणाने वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
सट्ट्यात 60 हजार गमावले; मानसिक तणावात तरुणाची वाशी खाडीत उडी घेऊन आत्महत्या

नवी मुंबई: तात्काळ पैसे कमवण्याच्या मोहात एका तरुणाचा बळी गेला आहे. क्रिकेट सामन्यावर लावलेल्या सट्ट्यामध्ये 60 हजार रुपयांचा फटका बसल्यानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या तरुणाने वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली असून, पोलीस आणि नातेवाईक तरुणाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण नवीन पनवेल येथील रहिवासी आहे. काही दिवसांपासून तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत होता. शनिवारी रात्री झालेल्या एका सामन्यावर त्याने तब्बल 60 हजार रुपये लावले होते. मात्र सर्व पैसे हरल्याने तो पूर्णपणे मानसिक तणावात गेला. आर्थिक नुकसान आणि अपयश यामुळे घाबरलेला तरुण घर सोडून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी वाशी स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून त्याने थेट वाशी खाडीत उडी घेतली. ही घटना काही प्रवाशांनी पाहिली असून त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. बोटींमार्फत वाशी खाडीत शोधकार्य सुरू असून, नातेवाईकही या शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत.

हेही वाचा: 24 टन साखर आणि ट्रकसह फरार झालेल्या चालकाला गुजरातमधून अटक

तरुणाच्या कुटुंबीयांनाही त्याच्या सट्टेबाजीबाबत काहीच माहिती नव्हती. पोलीस तपासात समोर आलं आहे की, तो काही दिवसांपासून ऑनलाईन अ‍ॅप्स आणि सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यमातून सट्ट्यात सहभागी होत होता. जलद पैसे कमावण्याची लालसा आणि मित्रवर्गाच्या प्रभावामुळे त्याने सट्टेबाजी सुरू केली होती.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पालकांमध्येही चिंता पसरली आहे. अवघ्या काही रुपयांच्या नफ्यासाठी जीव गमावणाऱ्या या तरुणाच्या घटनेने अनेक प्रश्न उभे केले आहेत. सट्टेबाजीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, युवक त्यात अडकत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तरुणाचा शोध सुरू असून, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सट्टेबाजीचे नेटवर्क कोठून सुरू होते, कोणी त्याला यात ओढले, याचाही तपास केला जात आहे. या प्रकारामुळे सट्टेबाजीच्या जाळ्याविरोधात कडक कारवाईची गरज पुन्हा ऐरणीवर आली आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाईन व्यवहारांवर लक्ष ठेवणं काळाची गरज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version