Aditya-L1: भारताच्या पहिल्या सौर निरीक्षण मोहिमेने आदित्य-एल1 ने अवकाश विज्ञानातील मोठी कामगिरी नोंदवली आहे. मे 2024 मध्ये पृथ्वीवर आदळलेल्या अतिशय तीव्र भूचुंबकीय वादळामागील कारणे शोधण्यात या मोहिमेने दिलेल्या माहितीचा निर्णायक वापर झाला असल्याची माहिती इस्रोने निवेदनातून दिली. 'गॅनन स्टॉर्म' म्हणून ओळखल्या गेलेल्या या घटनेला गेल्या 20 वर्षांतील सर्वात शक्तिशाली सौर वादळ मानले जाते. इस्रोच्या म्हणण्यानुसार, आदित्य-एल1ने नासाच्या पवन (WIND) उपग्रहासह एकूण सहा अमेरिकन उपग्रहांबरोबर समन्वय साधत अवकाशातील बदलांचे अचूक निरीक्षण केले. या मिशनने पुरवलेल्या अचूक चुंबकीय क्षेत्र मोजमापामुळे जगभरातील संशोधकांना या वादळाची तीव्रता नेहमीपेक्षा इतकी अधिक का होती? याच कारण समजलं आहे.
काय घडलं होतं अवकाशात?
गॅनन स्टॉर्म हा सूर्यावरील मोठ्या कोरोनल मास इजेक्शन (CMEs) म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागावरील प्रचंड स्फोटांच्या मालिकेचा परिणाम होता. सूर्यापासून निघणाऱ्या या प्रचंड उर्जेच्या लाटा पृथ्वीच्या आजूबाजूच्या चुंबकीय संरक्षण कवचाशी धडकल्या की त्याचा थेट परिणाम उपग्रह, संचार व्यवस्था, GPS प्रणाली आणि अगदी वीजपुरवठ्यावरही होऊ शकतो. या वादळात मात्र एक अनपेक्षित घटना घडली. दोन CME अवकाशात एकमेकांना धडकले. यामुळे त्यांची चुंबकीय संरचना तुटून पुन्हा नव्या पद्धतीने जोडली गेली. “चुंबकीय पुनर्संयोजन” (Magnetic Reconnection) म्हणून ओळखली जाणारी ही प्रक्रिया इतकी तीव्र होती की वादळाचा जोर अपेक्षेपेक्षा अनेक पट वाढला. इस्रोच्या माहितीनुसार, या घटनेमुळे सौर वादळातील कणांचा अचानक वेग वाढलेला आढळला. यामुळे चुंबकीय क्षेत्रातील पुनर्संयोजन प्रत्यक्ष घडत असल्याची खात्री मिळाली.
हेही वाचा – WiFi Connection Tips: Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? ही स्मार्ट आणि सोपी ट्रिक वापरून लगेच कनेक्ट करा
भारतीय वैज्ञानिकांची जागतिक पातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
या संशोधनाचे निष्कर्ष Astrophysical Journal Letters मध्ये प्रकाशित करण्यात आले असून, प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील वादळाचे निरीक्षण एकाच वेळी विविध अवकाश स्थानकांतून करण्यात आले. आदित्य-एल1ने दिलेल्या डेटावरून संशोधकांनी पुनर्संचयित क्षेत्राचा आकार तब्बल 1.3 दशलक्ष किलोमीटर रूंद असल्याचा अंदाज वर्तवला. हा आकार पृथ्वीच्या 100 पट आहे. इस्रोने म्हटले की, या संशोधनामुळे सौर वादळांची निर्मिती, प्रवास आणि पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांची समज अधिक व्यापक झाली आहे. जगभरात अवकाश हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांसाठी हा शोध क्रांतिकारक ठरणारा आहे.
भारताची अवकाश विज्ञानातील क्षमता अधोरेखित
इस्रोने स्पष्ट केले की, आदित्य-एल1च्या अचूक निरीक्षणांमुळे भारताची अवकाश संशोधनातील भूमिका अधिक बळकट झाली आहे. सूर्याच्या वर्तनाचा आणि सौर वादळांचा अंदाज बांधण्यासाठी भारत आता अधिक तयार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये प्रक्षेपित झालेलं आदित्य-एल1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेलं भारताचं पहिलं अवकाश अभियान असून, त्याच्या कामगिरीने जागतिक स्तरावर भारतीय संशोधनाचा दबदबा निर्माण केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.