मुंबई सेंट्रल येथून राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीस जाणाऱ्या प्रवाशांचा आता प्रवासाचा एक तास वाचणार आहे. मुंबई सेंट्रल-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस शनिवारपासून पुश-पुल पद्धतीने चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. यामुळे मुंबई-दिल्ली प्रवासात प्रवाशांचा एक तास कमी होणार आहे.
राजधानी एक्स्प्रेस सद्यस्थितीत मुंबई-दिल्ली हे 1384 किमीचं अंतर सुमारे 16 तासांत पार करते.
पुश-पुल पद्धतीने राजधानी एक्स्प्रेसच्या पुढे आणि मागे प्रत्येकी 6000 अश्वशक्तीचं इंजिन जोडण्यात येईल.
यामुळे स्थानकातून रवाना होताच अल्पावधीत तिला वेग घेता येईल.
शिवाय ब्रेक तातडीने कार्यान्वित करणे अधिक सोपं होईल.
यामुळे प्रवासी अंतर वेगाने कापणं शक्य होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
राजधानी ‘पुश-पुल’ पद्धतीने चालवण्याकरिता आवश्यक सर्व परवानगी प्राप्त झाल्या आहेत. शनिवारपासून काही दिवस ‘राजधानी’ पुश-पुल पद्धतीने धावणार आहे. त्यानंतर वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल’, अशी माहिती दिली.
राजधानी एक्स्प्रेसनंतर पुढील टप्प्यात ‘ऑगस्ट क्रांती’ राजधानी देखील पुश-पुल पद्धतीने चालवण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन राजधानी पुश-पुल पद्धतीने धावत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.