मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा ‘सुपर संडे’ राजकीय भूकंपाचा ठरला आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक संयुक्त सभेची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबाग-परळमध्ये मोठी गळती लागली आहे. शिवसेनेचे (उबाठा) निष्ठावंत नेते आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला आहे.
बालेकिल्ल्याला खिंडार: ‘निष्ठावंता’चा जय महाराष्ट्र!
दगडू सकपाळ हे शिवसेनेचे केवळ नेते नव्हते, तर दक्षिण मुंबईतील पक्षाचा मुख्य आधारस्तंभ होते. प्रभाग क्रमांक 203 मधून मुलगी रेश्मा सकपाळ यांना उमेदवारी न मिळाल्याने ते प्रचंड नाराज होते. “रक्त सांडले पण पक्षाला विचारांची किंमत वाटली नाही, तिथे राहणे आता योग्य नाही,” अशी भावनिक खंत व्यक्त करत सकपाळ यांनी ठाकरेंची साथ सोडली. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या मुलीसह शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल होत आहेत.
#WATCH | Maharashtra: Former Shiv Sena MLA Dagdu Sakpal leaves Shiv Sena (UBT) and joins Deputy CM Eknath Shinde-led Shiv Sena. (Video: Shiv Sena) pic.twitter.com/MQEyXwSg6G — ANI (@ANI) January 11, 2026
उपमुख्यमंत्र्यांची ‘रणनीती
तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकपाळ यांच्या परळमधील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. ही भेट राजकीय गणिते बदलणारी ठरली. ज्या दिवशी ठाकरे बंधू एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करत आहेत, त्याच दिवशी त्यांचा ‘ग्राऊंड लेव्हल’चा हुकमी एक्का फोडून शिंदेंनी ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. शिवडी आणि परळ परिसरातील शिवसेनेची हक्काची मतपेढी आता महायुतीकडे वळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाकरे गटासमोर मोठे आव्हान
एकीकडे शिवाजी पार्कवर भावनिक साद घातली जात असताना, दुसरीकडे जमिनीवरचे जुने जाणते कार्यकर्ते सोडून जात असल्याने ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. निष्ठावंतांची ही गळती येत्या 15 जानेवारीच्या मतदानावर काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दगडू सकपाळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश हा मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या समीकरणात महायुतीसाठी ‘बूस्टर डोस’ मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.