Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस असून गेल्या दोन-तीन दिवसांत त्यांची शारीरिक स्थिती कमालीची खालावली आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही प्रत्यक्ष कार्यवाही सुरू न झाल्याने जरांगे पाटील यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे.
'कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे का?' जरांगे पाटलांचा सवाल
शासनाच्या ढिसाळ कारभारावर आणि टाळाटाळ करण्याच्या वृत्तीवर जरांगे पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या सरकारकडून केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू असून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी दुसऱ्या जातींना डाग लावण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आधीच्या रद्द केलेल्या 4 सनदा/प्रमाणपत्रे तातडीने वैध करून देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. हैदराबाद गॅझेटनुसार तसेच सातारा आणि कोल्हापूर संस्थानांचे जीआर काढून तत्काळ अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली.
58 लाख नोंदींनुसार आजपासूनच जात प्रमाणपत्र वाटप सुरू करा
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मसुदा पूर्णपणे लागू करण्याची आग्रही भूमिका मांडली आहे. आतापर्यंत शोधण्यात आलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे आजपासूनच मराठा बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू केले पाहिजे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. याशिवाय ECBC कोट्यातून निवड झालेल्या मराठा तरुणांना तातडीने शासकीय सेवांमध्ये नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रहार आणि मुंबई आंदोलनाचा इशारा
शासकीय मसुद्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, उपोषणामुळे आंदोलकांची तब्येत बिघडण्याची आणि ते बेशुद्ध पडण्याची वाट सरकार पाहत आहे. जरांगे पाटील यांच्या मते, मराठा समाज जर चवताळला तर सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. आंदोलकांपैकी एकालाही इजा पोहोचल्यास किंवा दंगल घडवण्याचे षडयंत्र आखल्यास तीव्र पडसाद उमटतील. आवश्यकता भासल्यास उपोषण मागे घेऊन टप्पू-गोटे घेऊन व्यासपीठावर बसू आणि थेट लढा देऊ, असा सज्जड दम त्यांनी दिला.
आरक्षण लढा निर्णायक वळणावर
अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची गर्दी वाढत असून मनोज जरांगे पाटील यांच्या ढासळत्या आरोग्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण आहे. सरकारने वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास हा लढा मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचेल, असे संकेत या वक्तव्यातून स्पष्टपणे मिळाले आहेत.
हेही वाचा – Laxman Hake : न तोडगा निघाला, न चर्चा झाली; लक्ष्मण हाके मुंबईच्या दिशेने रवाना, ओबीसींचं आंदोलन पेटलं
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.