Manoj Jarange Patil Drinks Water: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे गेल्या 5 दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 29 ऑगस्टपासून सुरू असलेल्या या उपोषणाच्या 5 व्या दिवशी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची भेट घेतली. सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य केल्याचे सांगत लाड यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली; मात्र मनोज जरांगे यांनी ही विनंती फेटाळत उपोषण चालू ठेवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
हैदराबाद गॅझेट आणि किमान 4 प्रमाणपत्रांच्या वाटपाची अट
आरक्षणाची निव्वळ आश्वासने नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. मराठवाड्यातून हैदराबाद गॅझेटच्या (Hyderabad Gazette) आधारे कुणबी प्रमाणपत्रांचे प्रत्यक्ष वाटप सुरू झाल्याशिवाय आणि किमान 4 प्रमाणपत्रे हातात मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सातारा आणि कोल्हापूर गॅझेटची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 2 दिवसांची मुदत दिली आहे.
'सलाईन घेईन, पाणी पीईन, पण उपोषण थांबवणार नाही'; नेत्यांवर निशाणा
'तुमच्या शब्दाचा मान राखतो, पण उपोषण सोडणार नाही. शरीरात ताकद राहावी म्हणून दोन सलाईन आणि पाणी घेईन, पण सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील,' असे जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याच वेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुतीतील श्रेयवादात अडकल्याचा आरोप करत त्यांनी मध्यस्थी करणाऱ्या मंत्र्यांवर जोरदार टीका केली. श्रेय शिंदेंनी घ्यायचं की फडणवीसांनी यावरून लढाई सुरू आहे, असे ते म्हणाले. तसेच, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अविश्वास दाखवत, 'ते आमची शाळा घेत आहेत,' असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्त्वाच्या घोषणा आणि 12 तारखेचा अल्टिमेटम; सरकार काय निर्णय घेणार?
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महायुती सरकारतर्फे अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या, सविस्तर जाणून घेऊ..
– ओबीसी सवलती: ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सर्व सवलती मराठा समाजालाही दिल्या जातील.
– हैदराबाद गॅझेटची मागणी मान्य: हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची अट सरकारने अधिकृतपणे मान्य केली असून राज्यात 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल. हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्यंत सुरु करणार असून पहिले प्रमाणपत्र मनोज जरांगे यांच्या हस्ते देणार असल्याची घोषणा लाड यांनी केली.
– सारथी संस्था अन् मंत्रालय कक्ष: बार्टी आणि महाज्योतीच्या धर्तीवर 'सारथी' संस्था प्रभावीपणे राबवली जाईल, तसेच मंत्रालयात विशेष 'मराठा कक्ष' सुरू केला जाईल.
या सर्व घोषणांनंतर प्रसाद लाड यांनी उद्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह येण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली; मात्र जोपर्यंत सरकारच्या निर्णयाचा अधिकृत जीआर (GR) प्रत्यक्ष हातात येत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले. येत्या 12 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने सर्व प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि त्यांनी दिलेल्या मुदतीमुळे राज्य सरकारपुढील अडचणी वाढल्या असून, आता महायुती सरकार यावर काय मार्ग काढते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – Laxman Hake : न तोडगा निघाला, न चर्चा झाली; लक्ष्मण हाके मुंबईच्या दिशेने रवाना, ओबीसींचं आंदोलन पेटलं
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.