Ambernath Election: ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात 'किंगमेकर' मानल्या जाणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ नगरपालिकेत भाजपला धोबीपछाड दिली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने भाजप अंबरनाथमध्ये सत्ता काबीज करण्याच्या तयारीत होती, त्याच राष्ट्रवादीला श्रीकांत शिंदेंनी आपल्या गोटात खेचले आहे. एका रात्रीत फिरवलेल्या या राजकीय चक्रामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती अपयशी ठरली असून, सत्तेचा मार्ग पुन्हा शिवसेनेकडे (शिंदे गट) वळला आहे.
भाजपची 'ती' विचित्र युती
अंबरनाथच्या निवडणुकीत शिवसेनेने 27 जागांसह सर्वाधिक संख्याबळ मिळवले होते, तर भाजपच्या पदरात 14 जागा पडल्या होत्या. मात्र, शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेसच्या 12 आणि राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांशी हातमिळवणी केली होती. भाजपने काँग्रेसशी केलेल्या या अजब युतीची चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली. मात्र, याच संधीचा फायदा घेत श्रीकांत शिंदेंनी करेक्ट कार्यक्रम केला.
राष्ट्रवादीचा भाजपला रामराम अन् ठाणे कनेक्शन
भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी आता शिवसेनेची (शिंदे गट) वाट धरली आहे. हे नगरसेवक ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र देणार आहेत. त्यानंतर हे चारही नगरसेवक अधिकृतपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यामुळे भाजपचे सत्तेचे गणित पूर्णपणे विस्कटले आहे.
हेही वाचा – Eknath Shinde : अजित पवारांच्या पुण्यात एकनाथ शिंदे कडाडले; लाडकी बहीण योजनेबाबत केलं मोठं वक्तव्य
फोडाफोडीच्या राजकारणात शिंदेंची बाजी
काँग्रेसने आपल्या 12 बंडखोर नगरसेवकांना निलंबित केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी तातडीने त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. या मेगा भरतीच्या जोरावर भाजप सत्ता स्थापनेच्या तयारीत होती. मात्र, राष्ट्रवादीला सोबत घेऊन श्रीकांत शिंदे यांनी आकड्यांचे गणित आपल्या बाजूने वळवले. आता शिवसेना (27) + राष्ट्रवादी (4) अशा 31+ संख्याबळासह शिवसेनेने सत्तेचा प्रबळ दावा ठोकला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.