Amit Thackeray : मुंबईतील साठ्ये कॉलेजच्या आवारात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक तीव्र हिंसक चकमक उडाली. नवीन विद्यार्थ्यांच्या नोंदणी मोहिमेवरून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि वातावरण चांगलेच तापले. या घटनेनंतर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना स्पष्ट आणि रोखठोक शब्दात सुनाावले असून, यापुढे अशा प्रकारची मुजोरी सहन केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.
मुलींची छेडछाड केल्यास चोप देणार; ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
पत्रकार परिषदेत बोलताना अमित ठाकरे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. “जर कोणी विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणार असेल किंवा त्यांचा हात धरून ओढण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला आमचे कार्यकर्ते नक्कीच मारणार,” असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ABVP चे कार्यकर्ते मनविसेच्या स्टॉल शेजारी जबरदस्तीने जागा अडवून बसले होते आणि तिथून जाणाऱ्या विद्यार्थिनींना त्रास देत होते, असा थेट आरोप त्यांनी केला. मनविसे नेहमीच नियमांचे पालन करून नोंदणी मोहीम राबवते, मात्र ABVP सत्ताधारी पक्षाच्या बळावर कॉलेजच्या गेटवर नियम धाब्यावर बसवून गोंधळ घालत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘आमच्या नादाला लागू नका’; भाजपवरही साधला निशाणा
अमित ठाकरे यांनी ABVP च्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. “2014 पासून केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. विद्यार्थ्यांचे पिण्याच्या पाण्याचे, अस्वच्छ स्वच्छतागृहांचे आणि इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता पुरेशी असते. मनविसे अशा प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करून नवीन वॉटर कुलर आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करत आहे. परंतु ABVP कडे कसलेही ठोस काम उरलेले नसल्याने ते फक्त प्रसिद्धीसाठी मनविसेच्या कामात अडथळा आणण्याचे आणि बुडबुड करण्याचे काम करत आहेत,” असे ते म्हणाले.
विद्यार्थी सेनेचा वाढता प्रभाव आणि राजकीय खडाजंगी
मनविसेची वाढती लोकप्रियता आणि विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहूनच विरोधक बिथरले असल्याचा दावा अमित ठाकरे यांनी केला. “मी अध्यक्ष झाल्यापासून जेव्हा जेव्हा आमचे कार्यकर्ते कॅम्पसमध्ये उतरतात, तेव्हा ABVP मुद्दाम आमच्या शेजारी स्टॉल लावून वाद निर्माण करते. विद्यार्थ्यांना त्यांच्यात आता रस उरलेला नाही,” असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी मनविसे कायम मैदानात असेल. या राड्यामुळे मुंबईतील कॉलेज राजकारण पुन्हा एकदा पेटले असून दोन्ही संघटनांमधील संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.