Rahul Narvekar: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलाबा येथील प्रभाग क्रमांक 226 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातील उमेदवार तेजल पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर धमकावल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, नार्वेकर यांनी हे सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत उलट तेजल पवार यांच्यावरच गंभीर पलटवार केला आहे. ‘उमेदवारी मागे घेण्यासाठी तेजल पवार यांनीच 5 कोटी रुपयांची मागणी केली होती,’ असा खळबळजनक दावा नार्वेकर यांनी केला आहे.
राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे प्रभाग 226 मधून निवडणूक लढवत आहेत. याच वॉर्डमधून रिंगणात असलेल्या तेजल पवार यांनी असा आरोप केला होता की, नार्वेकर यांनी त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला आणि त्यांना धमकावले. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी नार्वेकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विचारले की, ‘तेजल पवार यांना चार-पाच दिवसांनंतर जाग आली का? मी त्यांना कधी पाहिलंही नाहीये. त्या कोण आहेत मला माहिती नाही. माझी त्यांची साधी ओळखही नाही.’ त्यांनी पुढे असा दावा केला की, तेजल पवार यांचे पती दीपक पवार यांनीच उमेदवारी मागे घेण्याच्या बदल्यात 5 कोटी रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान, या वादाचे रूपांतर आता मोठ्या राजकीय संघर्षात झाले आहे. तेजल पवार यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मनसे, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षांनी नार्वेकरांच्या विरोधात एकजूट केली आहे. या सर्व पक्षांनी मिळून तेजल पवार यांना पाठिंबा जाहीर केला असून, मकरंद नार्वेकर यांच्यासमोर सर्वपक्षीय तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परस्परविरोधी आरोपांमुळे आता हा वॉर्ड मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सर्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.