Devendra Fadnavis: “तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात हा ‘देवाभाऊ’ तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. मात्र जर तुम्ही भ्रष्टाचाराची वाट धरली किंवा जनतेशी गैरवर्तन केले, तर लक्षात ठेवा – चुकीला माफी मिळणार नाही,” अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे कान टोचले आहेत. सोलापूर दौऱ्यावर असताना एका भव्य मेळाव्यात ते बोलत होते. निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर लोकप्रतिनिधींमध्ये येणाऱ्या अहंकारावर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना ‘डाऊन टू अर्थ’ राहण्याचा सल्ला दिला.
‘जनतेशी वागताना भान ठेवा’: लोकप्रतिनिधींना मोलाचा सल्ला
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, जनता केवळ विकासकामे पाहत नाही, तर तुमचा लोकांशी असलेला व्यवहार कसा आहे, हे देखील पाहते. विकास थोडा कमी झाला तरी लोक समजून घेतात, पण लोकप्रतिनिधींचा उद्धटपणा कधीही खपवून घेतला जात नाही. भाजपची परीक्षा केवळ पंतप्रधान मोदींच्या कामावरच नाही, तर स्थानिक पातळीवर तुमच्या वागण्यावरून लोक पक्षाचे मूल्यमापन करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराबाबत ‘झिरो टॉलरन्स’ पाळण्याचे आदेश देत, पारदर्शकता टिकवण्यासाठी कोणालाही पदावरून दूर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
सोलापूरच्या विकासाचे ‘व्हिजन’ आणि नव्या घोषणा
सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (Engineering College) प्रश्न आता मार्गी लागला असून, हे महाविद्यालय याच वर्षापासून सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सोलापूरच्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आयटी पार्कसाठी (IT Park) जागा हस्तांतरणाचे आदेश फेब्रुवारीमध्येच काढण्यात आले आहेत. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजय गायकवाड प्रकरणावर ओढले ताशेरे
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या वादावरून केलेल्या शिवीगाळ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “1979 च्या पुस्तकावरून आज निरर्थक वाद उकरून काढणे हे असंवेदनशील कृत्य आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करणे योग्य नाही,” असे म्हणत त्यांनी गायकवाडांना सुनावले. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अपमान करू शकत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सोलापुरातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करू. सोलापुर की जनता की आशा-आकांक्षाओं को पूरा करेंगे। ( नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार | सोलापूर | 28-4-2026)#Maharashtra #Solapur #LocalBodyElections pic.twitter.com/TjYFM7ZbPH — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 28, 2026
विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपच्या घवघवीत विजयाबद्दल बोलताना फडणवीस यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप कार्यकर्त्यांच्या फौजेचे भरभरून कौतुक केले. हा विजय म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला अढळ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भाजपला हे यश संपादन करता आले, अशी पावतीही त्यांनी यावेळी दिली. या मेळाव्यामुळे सोलापूर भाजपमध्ये एक नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.