बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान बारामती पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीकडून सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला आहे. बारामती पोटनिवडणुक बिनविरोध लढवावी यासाठी सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनी कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे.
हेही वाचा- Harshwardhan Sapkal : “…तर कॉंग्रेसचा उमेदवार अर्ज मागे घेईल” बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार? हर्षवर्धन सपकाळ थेट बोलले…
बिनविरोध निवडणुकीसाठी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट
दरम्यान सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांच्या विनंतीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत म्हटलं की, “अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत महाराष्ट्रात रितसर गुन्हा दाखल व्हावा. जर ही मागणी पूर्ण झाली, तर मी बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहोत. आमची अट, शर्त कुठल्याही प्रकारे चुकीची नाही. सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा आमच्यासोबत संपर्क साधला आणि निवडणूक बिनविरोध लढण्याची विनंती केली होती. ज्या बिनविरोध निवडणुकांसाठी विनंती केली जात आहे. त्यासंदर्भात आम्ही आमच्या पक्षातील बड्या नेत्यांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ.” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच बारामती पोटनिवडणुकी दरम्यान राजकीय हालचालींना वेग आले असून महाविकास आघाडीत समन्वयाची चाचपणी होण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.