Rupali Thombare: भोंदू बाबा अशोक खरात याच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली ठोंबरे यांनी माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. खरातवर आधीच गुन्हा दाखल झाला असता, मात्र चाकणकर यांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर ‘तोडपाणी’ करून आरोपीला वाचवल्याचा दावा ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणातील आर्थिक उलाढाल किती कोटींची आहे, याचा तपास SIT ने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संविधानिक पदाचा गैरवापर आणि आरोपीला संरक्षण
रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे की, संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे आणि त्याच्या संगनमताने रॅकेट चालवणे या गुन्ह्यात रुपाली चाकणकर या प्रमुख सह-आरोपी ठरतात. अशोक खरात याच्याविरोधात तक्रार का झाली नाही, याचे कारण देताना ठोंबरे म्हणाल्या की, ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले होते, त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. जर वेळीच FIR दाखल झाली असती, तर दीडशेहून अधिक महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. या सर्व प्रकरणात चाकणकर कुटुंबातील कोणाचे व्हिडिओ आहेत का, याचीही माहिती महाराष्ट्रातील महिलांना मिळाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कौटुंबिक वाद आणि ‘डीएनए’ टेस्टचा धक्कादायक प्रकार
या प्रकरणातील पीडित महिलांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. मूल होत नाही म्हणून अनेक महिला या भोंदू बाबाकडे गेल्या होत्या, मात्र आता जे सत्य समोर आले आहे, त्यामुळे अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या प्रकारामुळे घराघरात कौटुंबिक वाद विकोपाला गेले असून प्रकरण DNA टेस्टपर्यंत पोहोचले आहे. “मी त्या महिलांना पोलीस तक्रार करण्यासाठी सक्ती करू शकत नाही, कारण त्यांची मानसिक तयारी होणे गरजेचे आहे. जेव्हा त्यांना विश्वासाचे वातावरण वाटेल, तेव्हाच त्या बाहेर पडतील,” असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Ashok Kharat Nashik Case : केसरकर, चाकणकर यासारख्या लोकांनी खरातला पोसलं, यांचे आर्थिक सोर्स काय?
तृप्ती देसाई आणि पेनड्राइव्ह प्रकरणावर प्रश्नचिन्ह
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या भूमिकेवरही रुपाली ठोंबरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जर देसाई यांना हे व्हिडिओ आधीच मिळाले होते आणि त्यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होते, तर त्याच वेळी कारवाई का झाली नाही? असा सवाल त्यांनी केला. सध्या सोशल मीडियावर आणि संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाचे अनेक पेनड्राइव्ह पोहोचले आहेत. या रॅकेटचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत आणि पोलिसांनी आरोपींच्या अटकेनंतर जी माहिती मिळवली आहे, ती सरकारने तातडीने समोर आणावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.