Anil Deshmukh Attack : अनिल देशमुखांवरील कथित हल्ला खोटा? पोलिसांच्या तपासामुळे नवे राजकीय वादळ

महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
Anil Deshmukh Attack : अनिल देशमुखांवरील कथित हल्ला खोटा? पोलिसांच्या तपासामुळे नवे राजकीय वादळ

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या कथित हल्ल्याबाबत नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालानुसार घटनेबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत आणि फॉरेन्सिक तपासातही हल्ला खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही घटना 19 नोव्हेंबर 2024 रोजी घडल्याचे सांगण्यात आले होते. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनिल देशमुख आपल्या मुलाच्या प्रचारासाठी गेले होते. नरखेडहून काटोलकडे परतताना बैलफाटा येथे अंधारात दबा धरून बसलेल्या चार जणांनी गाडीसमोर येत दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेत देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती.

घटनेनंतर त्यांना तातडीने नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले होते आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, दीर्घ तपासणीनंतर पोलिसांनी या हल्ल्याबाबत कोणतेही तथ्य आढळले नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले आहे.

आता या अहवालानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरोखर हल्ला झाला होता की राजकीय आश्रय मिळवण्यासाठी ही कथा रचली गेली होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वादंग निर्माण केला आहे. पोलिसांच्या निष्कर्षानंतर हल्ल्याची सत्यता मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आली असून, पुढील काही दिवसांत यावर राजकीय प्रतिक्रियांचा भडिमार होण्याची शक्यता आहे. आता अनिल देशमुख यांची भूमिका काय असेल आणि या घडामोडींचा निवडणूक राजकारणावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version