मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला यश मिळाले असले तरी मुंबईचा महापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपनं महापौरपदावर दावा केला असला तरी शिंदेच्या शिवसेनेनेसुद्धा महापौरपदाची इच्छा व्यक्त केली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर खोचक टीका करत, हा निर्णय दिल्लीत होणार असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत अमित शाह मुंबईच्या महापौरांचा निर्णय घेतील. संजय राऊत म्हणाले की, शिंदेंचं फार मनावर घेऊ नका. महापौर महायुतीचाच होणार असेल, तर मग सौदेबाजी का सुरू आहे. नगरसेवकांना लपून ठेवणं, इतरांचे फोडण्याचे विकत घेण्याचे प्रयत्न करणे, आमिष दाखवणं, दहशत दाखवणं. एखादा आमदार-खासदार ज्या चिन्हावर निवडून आला असेल तर तो त्याच पक्षात काम करणं गरजेचं आहे. जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर आधीच्या पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे. पण शिंदे आणि भाजपच्या बाबतीत असं दिसत नाही. ते दुसऱ्या पक्षातील नगरसेवक आमदार-खासदारांना विकत घेतात. भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणार. मतदाराला मतदानापासून दूर ठेवणे याला प्रतारणा म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे महापौरपदाचा दावा सुटणार नाही, असा दावा करून काही दुसरी पदं पाडून घेता येतील का. त्यांना स्टॅंडिंग कमिटीमध्ये जास्त रस आहे. महापौर हे शोभेचं पद आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.