मुंबई: मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटक मृत्यूमुखी पडल्यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. अशातच, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सर्वपक्षीय बैठकीत फक्त पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिल्यामुळे ओवैसींनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात मी काल रात्री किरेन रिजिजू यांना संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले की, 5 ते 10 खासदार असलेल्या पक्षांनाच या बैठकीचं आमंत्रण देण्यात येणार आहे. यावर मी त्यांना प्रश्न विचारला की, कमी सदस्य असलेल्या पक्षांना आमंत्रण का नाही? यावर किरेन रिजिजू म्हणाले की, यामुळे बैठक लांबली जाईल. मग मी म्हणालो की, आमच्यासारख्या लहान पक्षांचं काय मग?’
ही भाजपची किंवा इतर कोणत्याही पक्षाची अंतर्गत बैठक नसून सर्वपक्षीय बैठक आहे. यामुळे दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना आपल्या देशातील एकतेचा संदेश मिळेल. सर्व पक्षांचं म्हणणं ऐकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिरिक्त वेळ काढू शकत नाहीत का?’ असा प्रश्नही ओवैसींनी यावेळी विचारला.
हेही वाचा: भारताकडून सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती; पाकड्यांची कोंडी
आम्हालाही महत्वाच्या मुद्द्यावर भूमिका मांडण्याचा अधिकार
‘तुमच्या स्वतःच्या पक्षाकडे बहुमत नाही. 1 खासदार असलेला पक्ष असो किंवा 100 खासदार असलेला पक्ष असो, ते दोघेही भारतीयांनी निवडून दिले आहेत आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर त्यांचे म्हणणे ऐकण्यास पात्र आहेत. हा राजकीय मुद्दा नसून राष्ट्रीय मुद्दा आहे. त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने सर्व पक्षांची बैठक करावी, संसदेमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला त्यांनी आमंत्रित केले पाहिजे’, अशी प्रतिक्रिया ओवैसींनी एक्सवर पोस्ट केली आहे.
Regarding the Pahalgam All Party Meeting, I spoke to @KirenRijiju last night. He said they’re thinking of inviting only parties with “5 or 10 MPs.” When I asked why not parties with fewer MPs, he said that the meeting would get “too long.” When I asked “What about us, the smaller… — Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 24, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.