Abhijeet Dipke : ‘हे जंतर-मंतर नाही, इथे ही नौटंकी चालणार नाही’; पार्कमधील बैठकीवरून तुफान राडा; दीपकेंना रहिवाशांनी हाकलले

या घटनेपूर्वी पत्रकारांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी सरकार आणि सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले होते.
Abhijeet Dipke : ‘हे जंतर-मंतर नाही, इथे ही नौटंकी चालणार नाही’; पार्कमधील बैठकीवरून तुफान राडा; दीपकेंना रहिवाशांनी हाकलले

Abhijeet Dipke CJP Jantar Mantar Season 2: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्लीतील एका निवासी सोसायटीच्या पार्कमध्ये तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. 'जंतर-मंतर सीझन 2' च्या आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी दीपके हे त्यांचे सहकारी सौरव दास, आशुतोष रंका आणि इतर समर्थकांसह या पार्कमध्ये जमा झाले होते. मात्र, एका निवासी परिसरात राजकीय बैठक आणि आंदोलनाचे नियोजन होत असल्याचे समजताच सोसायटीतील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत या बैठकीला जोरदार आक्षेप घेतला.  

'इथे कोणतीही नौटंकी चालणार नाही'; रहिवाशांचा आक्रमक पवित्रा
पार्कमध्ये पोहोचलेल्या रहिवाशांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना फैलावर घेत, 'हे स्थानिक रहिवाशांचे पार्क आहे, राजकीय आंदोलनाची जागा नाही,' असे सुनावले. वातावरणात तणाव निर्माण झाल्याने दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. 'इथे तुमची कोणतीही नौटंकी चालणार नाही, त्वरित येथून निघून जा,' असा इशारा रहिवाशांनी दिला. परिस्थिती अधिक बिघडत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि शेवटी अभिजीत दीपके व त्यांच्या समर्थकांना त्या पार्कमधून काढता पाय घ्यावा लागला.  

'वरून दबाव आहे'; हॉल मिळण्यात अडचणी येत असल्याचा CJP चा भाजपवर आरोप  
या घटनेपूर्वी पत्रकारांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी सरकार आणि सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले होते. दिल्लीत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी हॉल शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. 'अनेक ठिकाणी व्यवस्थापनाने वरून दबाव असल्याचे सांगत हॉल देण्यास नकार दिला,' असा दावा त्यांनी केला. शेवटी एका ठिकाणी हॉल मिळाला आणि पावतीही फाडण्यात आली होती, परंतु आयोजकांना धमकावून आणि गंभीर परिणामांची भीती दाखवून शेवटच्या क्षणी ती बुकिंग रद्द करण्यात आल्याचा आरोप दीपकेंनी केला.

हेही वाचा – Waris Pathan: 'अंबानींना मराठी बोलायला सांगणार का?' मराठी सक्तीच्या अल्टिमेटमवरून वारिस पठाण यांचा हल्लाबोल

'आता राजीनामा कोणाचा हवा?' या प्रश्नावरून तापले वातावरण  
हॉल उपलब्ध न झाल्याने अखेर सीजेपीच्या नेत्यांनी पार्कचा पर्याय निवडला होता. या उघड्या मैदानावरील बैठकीदरम्यान दीपके यांनी उपस्थित समर्थकांना 'आता कोणाचा राजीनामा हवा?' असा सवाल केला, त्यावर उपस्थितांनी 'मोदींचा' असे उत्तर दिले. याच दरम्यान या राजकीय चर्चेची कुणकुण सोसायटीतील नागरिकांना लागली आणि रहिवाशांचा जमाव तेथे एकत्र झाला. या घोषणाबाजीमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी पोलिसांना बोलावून ही बैठक उधळून लावली.  

सीजेपीकडून देशव्यापी 'लिसनिंग टूर'ची घोषणा; शिक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी  
या सर्व वादंगानंतर कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी पक्षाच्या आगामी मोहिमेची माहिती दिली. आगामी काळात सीजेपीतर्फे देशभरात 'लिसनिंग टूर' सुरू केली जाणार असून, याद्वारे सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. या संपूर्ण अभियानाच्या केंद्रस्थानी शिक्षणाचा मुद्दा असेल. सरकारी शाळांची बिकट अवस्था सुधारण्यासाठी पालक आणि नागरिकांनी एकत्र येऊन शाळांचे सोशल ऑडिट करावे आणि प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले आहे. 

हेही वाचा – Parliament Adjourned: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा गोंधळ; अमित शाह यांच्या निवेदनाआधीच लोकसभेचं कामकाज तहकूब, नेमकं काय घडलं?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version