राज्यात महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची 'दैनिक सामना' मध्ये संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली. ही मुलाखत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार आणि चित्रपट निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती, मराठी माणसाचे अस्तित्व, मुंबईचे प्रश्न आणि आगामी महापालिका निवडणुका यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे, महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो दिवस उजाडण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पहावी लागली?
हेही वाचा- Pune News : पुण्यात निवडणूक रणधुमाळीत शिवसेना नेत्याच्या वाहनावर हल्ला; 'हे' कारण समोर
यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले की, "काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं? हे आज आता सोडून दिलं पाहिजे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. मला असं वाटत ती एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयावर अनेक वर्षे मी बोलतोय, उद्धवही बोलतोय. परंतु आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे की, ज्याला आपण ‘अभी नही तो कभी नही’ म्हणतो तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. खरं तर एमएमआर रिजनवर येऊन ठेपलेली आहे. एमएमआर रिजन मी मुद्दाम बोलतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. कारण, आज एकत्र नाही आलो आणि आज या गोष्टीचा सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार."
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा एक वेगळा मुद्दा आहे, तो भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठिक आहे, राजकीय पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील"
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.