एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागणीला अद्यापही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. दरम्यान विरोधी पक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली आहे.
भाजप आ. गोपीचंद पडळकर यांनी व्हिडीओ शेअर करत एसटी कर्मचाऱ्यांना लढाई करण्याचे आवाहन करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत २८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही राज्य सरकारचा अबोला सुटत नाही. आत्महत्या केलेल्या कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे अश्रु पुसणे सोडा त्यांना सांत्वनपर पत्र देखील मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले नाही. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचे आणि मराठी माणूस संकटात आल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडायचे हाच राज्य सरकारचा मराठी बाणा आहे., असा टोला गोपीचंद पडळकर यांनी राज्यसरकारवर लगावला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले की, दोन ओळींचे सांत्वनाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही. एसटी कर्मचाऱ्यांनो आता एकच निर्धार, १० नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार. आता आत्महत्येचं पाऊल कुणीही उचलू नका. कारण आता लढायचंय आणि लढण्यासाठीचं जगायचंय… असे ट्विट करत येत्या १० नोव्हेंबर रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याची घोषणा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.