Ebola Virus 2026 : इबोला विषाणूचा धोका वाढला! भारतात अलर्ट जारी, तर मुंबई महापालिका यंत्राणाही सतर्क; विलगीकरण केंद्र सज्ज

Ebola Virus 2026 : इबोला विषाणूचा धोका वाढला! भारतात अलर्ट जारी, तर मुंबई महापालिका यंत्राणाही सतर्क; विलगीकरण केंद्र सज्ज

मुंबई : मुंबईसह राज्यभरात इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संशयित रुग्णांवर पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने सातरस्ता येथील कस्तुरबा हॉस्पिटलला इबोला संशयितांसाठी विलगीकरण केंद्र घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विलगीकरण, निरीक्षण आणि संसर्ग नियंत्रणाची अंमलबजावणी सुरू आहे. World Health Organization ने काँगो आणि युगांडामधील इबोला उद्रेकाला “आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी” घोषित केले आहे.

इबोला प्रभावित देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. ताप, अशक्तपणा, स्नायू दुखणे, उलट्या, जुलाब, पोटदुखी, पुरळ आणि डोळे लाल होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी केली जाणार आहे. विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंग आणि स्वयं-घोषणापत्र भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. युगांडाहून परतलेल्या नागपूरमधील एका 47 वर्षीय व्यक्तीला खबरदारी म्हणून 21 दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. BMC MARD ने निवासी डॉक्टरांसाठी संसर्ग नियंत्रण आणि पूर्वतयारीबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. इश्वर गिलाडा यांनी स्पष्ट केले की, इबोला हा हवेतून पसरणारा आजार नाही. लक्षणे दिसल्यानंतरच संक्रमित व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होऊ शकतो. 2 ते 21 दिवसांच्या इन्क्युबेशन काळात संसर्ग होत नाही. संक्रमित रक्त, शरीरातील द्रव, दूषित वस्तू किंवा वैद्यकीय उपकरणांच्या थेट संपर्कातून इबोलाचा प्रसार होतो. सध्या पसरत असलेल्या ‘Bundibugyo’ स्ट्रेनसाठी मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. भारतात आजपर्यंत इबोलाची स्थानिक पातळीवरील एकही केस आढळलेली नाही. 

हेही वाचा : Milind Narvekar : फडणवीस आणि ठाकरे गटाचा वाढता समन्वय, नार्वेकरांचा एक फोन आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शिंदे गटाला झटका

दरम्यान, बंगळूरुमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवलेल्या एका व्यक्तीची इबोला विषाणू रोगासाठीची चाचणी नकारात्मक आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले. भारतात आजपर्यंत इबोला विषाणू रोगाचा एकही निश्चित रुग्ण आढळलेला नाही, असेही मंत्रालयाने नमूद केले. “आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर आम्ही इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि अत्यंत खबरदारी घेत आहोत. युगांडाहून नुकताच प्रवास करून आलेल्या आणि अंगदुखीची सौम्य लक्षणे जाणवत असलेल्या एका व्यक्तीला निरीक्षण आणि पुढील तपासणीसाठी बंगळूरु येथील शासकीय साथरोग रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे,” असे मंत्रालयाने सांगितले. सौम्य अंगदुखी वगळता ती व्यक्ती इतर बाबतीत निरोगी होती. नमुना गोळा करून प्रयोगशाळेतील तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवण्यात आला. “चाचणीचा निकाल इबोला विषाणू रोगासाठी नकारात्मक आला आहे,” असे मंत्रालयाने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version