मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी एक हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार आहेत. लवकरच एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीसाठीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सध्या केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेत शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात. राज्याच्या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी आणखी सहा हजार रुपये मिळणार आहेत. थोडक्यात शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.