नियमांचा अमानुष फटका! अवघ्या महिना 500 रुपयांच्या पेन्शनसाठी सुनेवर आली 90 वर्षांच्या सासूला पाठीवरून 4-5 किलोमीटर नेण्याची वेळ

सुखमनिया असे या धाडसी सुनेचे नाव असून, ती आपल्या थकलेल्या सासूला पाठीवर घेऊन तासनतास तापलेल्या रस्त्यावरून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पोहोचली.
नियमांचा अमानुष फटका! अवघ्या महिना 500 रुपयांच्या पेन्शनसाठी सुनेवर आली 90 वर्षांच्या सासूला पाठीवरून 4-5 किलोमीटर नेण्याची वेळ

Woman Carries Mother-in-law to Bank : डिजिटल इंडिया आणि घरपोच सेवांचे दावे ग्रामीण भागात किती फोल ठरतात, याचे एक जिवंत आणि तितकेच वेदनादायी चित्र छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातून समोर आले आहे. येथील मॅनपाट विकासखंडांतर्गत येणाऱ्या जंगलपारा गावात राहणाऱ्या एका 50 वर्षीय आदिवासी महिलेला तिच्या 90 वर्षांच्या वृद्ध सासूला पाठीवर उचलून रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागली. एका पादचाऱ्याने या हृदयद्रावक प्रसंगाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर, सरकारी यंत्रणेच्या अमानुष कारभारावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सुखमनिया असे या धाडसी सुनेचे नाव असून, ती आपल्या थकलेल्या सासूला पाठीवर घेऊन तासनतास तापलेल्या रस्त्यावरून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पोहोचली. तिच्या सासूची दरमहा मिळणारी 500 रुपयांची वृद्धापकाळ पेन्शन गेल्या 4 महिन्यांपासून अचानक बंद झाली होती. वयोवृद्ध आणि अंथरुणाला खिळलेल्या सासूला बँकेत आणल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत असे समजल्याने, घरात वाहतुकीचे कोणतेही साधन नसताना सुखमनियाने उष्माघाताचा धोका पत्करून हा टोकाचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Bank Holiday June 2026: लक्ष द्या! जून महिन्यात ‘इतक्या’ दिवस बंद राहणार बँका; पाहा संपूर्ण यादी

कागदपत्रांच्या कचाट्यात अडकली वृद्धापकाळाची शिदोरी
– केवायसी (KYC) ठरले कारण: बँकेच्या नियमांनुसार ‘नो युवर कस्टमर’ म्हणजेच केवायसी पडताळणी अपूर्ण असल्यामुळे ही पेन्शन रोखून धरण्यात आली होती.
– घरपोच सेवा झाली बंद: यापूर्वी ‘बँक मित्र’ दरमहा वृद्ध महिलेच्या घरी जाऊन पेन्शनची रक्कम सुपूर्द करत असत, परंतु जानेवारी 2026 मध्ये शेवटचा हप्ता मिळाल्यानंतर तांत्रिक कारणास्तव ही सेवा प्रशासनाकडून खंडित करण्यात आली होती.

बँकेच्या दारात सासूला पाठीवर घेऊन आलेल्या या महिलेची अवस्था पाहून बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. त्यानंतर गेल्या 4 महिन्यांची थकीत असलेली एकूण 2,000 रुपयांची रक्कम या कुटुंबाला त्वरित सुपूर्द करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत मॅनपाट जनपद पंचायतीच्या सीईओ खुशबू शास्त्री यांनी स्पष्ट केले की, या क्षेत्रात बँक मित्रांची संख्या 7 असून, पुढील महिन्यापासून या वृद्ध महिलेला बँकेत येण्याची गरज पडणार नाही आणि पेन्शन पुन्हा घरपोच दिली जाईल.

नेत्यांची टीका आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या अत्यंत संवेदनशील प्रकरणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंग देव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘जे राजकारणी आणि सरकार गरिबांच्या दारात जाऊन मतांची भीक मागतात, त्यांनी अशा वृद्ध आणि हतबल नागरिकांच्या हक्काच्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचतील, याची जबाबदारी घेतली पाहिजे,’ अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासनाचे कान टोचले. तांत्रिक पडताळणीच्या नावाखाली 90 वर्षांच्या वृद्धेला अशा वेदनादायी प्रवासाला सामोरे जावे लागणे हे लोककल्याणकारी राज्यासाठी लज्जास्पद असल्याचे मत आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा – जुने ‘mAadhaar’ होणार कायमचे बंद! नव्या ‘Aadhaar App’ वर कसे शिफ्ट व्हावे? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version