आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पक्षातील नेते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली असून राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून देखील तयारीला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी आहे. यावेळी विधान परिषदेच्या 9 जागा 13 मे रोजी रिक्त होणार आहेत. अशात, विधान परिषदेसाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या नेत्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळाली नाही, त्यांनी आता विधान परिषदेसाठी ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी समोर येत आहे.
यावेळी महायुतीत पाहायचं झालं तर भाजपमध्ये 131 आमदार, शिवसेना शिंदे पक्षात 57 आमदार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षात 40 आमदार असून महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांची जोडणी असणे आवश्यक असते, अशातच महायुतीत आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता महायुतीचे 8 उमेदवार तर मविआचा अवघा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
यावेळी रणजीतसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तर विधान परिषदेसाठी केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही नेते परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. अशात यांच्यातून पुन्हा कोणाला संधी मिळते का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.