सोलापूर-मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे एका वडिलांना मोठा प्रसंग ओढवला, तर त्यांची तीन वर्षांची मुलगी शेकडो किलोमीटर एकटी प्रवास करत पुण्यापर्यंत पोहोचली. सुदैवाने रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे हा प्रसंग सुखरूप पार पडला.
काही सेकंदांत घडला मोठा प्रकार
राहुल खुरमुटे हे आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह सोलापूरहून मुंबईकडे जात होते. प्रवासादरम्यान गाडी कुर्डुवाडी स्थानकावर थांबली असता, मुलीला भूक लागल्याने ते बिस्कीट आणण्यासाठी खाली उतरले. मात्र, इतक्यात ट्रेनचे ऑटोमॅटिक दरवाजे बंद झाले आणि गाडी पुढे निघून गेली. वडील प्लॅटफॉर्मवरच राहिले, तर चिमुकली मुलगी गाडीत एकटीच पुढे निघाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे राहुल खुरमुटे हतबल झाले.
गाडीत रडणारी चिमुकली, प्रवाशांनी दिली माहिती
गाडीतील C-5 कोचमधील सीट क्रमांक 30 वर बसलेली ही चिमुकली आपल्या वडिलांना शोधत रडू लागली. तिच्या आजूबाजूच्या प्रवाशांना परिस्थिती समजताच त्यांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर टीटीई एच. एल. मीना यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. त्यांनी लगेचच पुणे कंट्रोल रूमला संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
प्रशासनाची झटपट हालचाल
रेल्वे पोलिसांनी आरक्षणाच्या तपशीलावरून मुलीच्या वडिलांचा संपर्क क्रमांक शोधून काढला. त्यानंतर परिस्थितीची माहिती देत पुढील उपाययोजना करण्यात आल्या.पुणे रेल्वे स्थानकावर संबंधित मुलीची आई वैशाली खुरमुटे यांना तातडीने बोलावण्यात आले. गाडी पुणे स्थानकात दाखल होताच रेल्वे पोलिसांनी त्या चिमुकलीला सुरक्षितरित्या बाहेर काढले. आईला पाहताच मुलगी धावत जाऊन तिच्या कुशीत शिरली. काही क्षणांपूर्वी घाबरलेली ती चिमुकली आईच्या भेटीनंतर शांत झाली. या प्रसंगामुळे खुरमुटे कुटुंबाने रेल्वे पोलिसांचे मनापासून आभार मानले
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.