पुणे : वारीदरम्यान ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती बिघडल्याने वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमाकांत भालेराव (वय 61) असे या वारकऱ्याचे नाव असून त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर ही घटना घडली. माहितीनुसार श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी क्राईम पीआय यांनी त्यांच्यासोबत जाऊन मदत केली. ही घटना पालखीच्या गर्दीत घडलेली नसून, पालखीपासून काही अंतरावर भालेराव यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी मोठी गर्दी नव्हती. त्यांना आधीपासूनच श्वसनाचा त्रास होत होता. त्याच कारणामुळे ते कोसळल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि क्राईम पीआय उपस्थित होते. मृताच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले असून, त्यांना पूर्वीपासूनच आजार होता, असेही स्पष्ट केले आहे. कुटुंबीयांनी शवविच्छेदन न करण्याची विनंती केली असून, त्याबाबतचा अंतिम निर्णय प्रशासनाकडून घेतला जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.