मुंबईतील कुलाबा नेव्ही नगर परिसरात नौदल जवानाने पत्नी ओमा दोन महिन्यांचा मुलगा दर्श आणि मोठा मुलगा यश यांच्यासह आत्महत्या केली होती. यादरम्यान चौघांचाही प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यानुसार पत्नी आणि दोन महिन्यांच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. तर मोठ्या मुलाला विष पाजल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यावेळी पत्नी आणि दोन मुलांच्या हत्येनंतर जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज दर्शवण्यात आला आहे. याचपार्श्वभूमिवर जवानाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची तयारी आहे. या घटनेमागचं मुळ कारण शोधण्यासाठी घटनास्थळावरुन फॉरेन्सिक पुरावे गोळा केले. तसेच मृत्यूला कारणीभूत ठरलेला घटनाक्रम समजून घेण्यासाठी तपास अधिकारी कुटुंबीय, शेजारी आणि इतर संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी गेले.
यादरम्यान 14 ऑगस्टच्या रात्री 11 वाजताचा पोलिसांच्या हाती व्हॉट्सॲप मेसेजवरून महत्त्वाचा पुरावा हाती लागला. जवानाने आपल्या वडिलांना “या आणि मृतदेह घेऊन जा” अशा आशयाचा मेसेज पाठवल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. त्यानंतर 15 ऑगस्टला सकाळी मेसेज पाहिल्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली. घटना घडण्यापूर्वी जवान आणि पत्नीच्या मोबाईलमधील डेटा डिलीट केला आणि फोन फॉरमॅट केल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे.
डिलीट केलेला डेटा मिळवण्यासाठी आता पोलीस सायबर तज्ज्ञांची मदत घेणार असून पोलिसांकडून कौटुंबिक, वैवाहिक आणि आर्थिक तणावाच्या दिशेने या प्रकरणाचा तपास लावला जात आहे. दरम्यान सध्या टॉक्सिकॉलॉजी, रासायनिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच अहवालानंतर मृत्यूचा नेमका क्रम आणि कारण स्पष्ट होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.