इराण: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील एका वृत्तपत्राच्या मुखपृष्ठाने जगभरात खळबळ उडवली आहे. इराणच्या “तेहरान टाइम्स (Tehran Times)” या इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केलेले एक धक्कादायक मुखपृष्ठ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुखपृष्ठावर मिनाब शहरातील एका शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या मुलींची छायाचित्रे छापण्यात आली असून त्यावर “ट्रम्प, त्यांच्या डोळ्यांत पाहा” (Trump, Look Them In The Eyes) अशी ठळक मथळी देण्यात आली आहे.
या मुखपृष्ठातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट आरोप करण्यात आला आहे. वृत्तपत्राच्या संपादकीयात अमेरिकेवर आणि इस्रायलवर तीव्र टीका करण्यात आली असून, सुरू असलेल्या संघर्षात चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे. संपादकीयात म्हटले आहे की, इराणविरोधातील लष्करी कारवाईबाबत ट्रम्प यांनी केलेल्या विधानांमध्ये अनेकदा दिशाभूल करणारे दावे करण्यात आले आहेत.
वृत्तपत्राच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील “शजरेह तय्येबेह” या शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला झाला. त्या वेळी शाळेत विद्यार्थिनी वर्गात अभ्यास करत होत्या. या हल्ल्यात शाळेची इमारत पूर्णपणे कोसळल्याचा दावा करण्यात आला असून त्यात अनेक विद्यार्थिनी आणि शिक्षकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. वृत्तपत्राच्या मते या हल्ल्यात 165 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.
Iran Tehran times released in the front page newspaper with Pictures of children killed during U.S. and Israel Joint Strikes against Iran on February 28 pic.twitter.com/PUzkoYLsls — OSINT Digest (@Indowatchosint) March 9, 2026
अल जझीरा या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, हल्ला झाला तेव्हा मुली वर्गात शिकत होत्या आणि अचानक क्षेपणास्त्रांचा मारा झाला. त्यामुळे शाळेची संपूर्ण इमारत ढासळून विद्यार्थिनी आणि शिक्षक मलब्याखाली दबले.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव अली लारीजानी यांनीही अमेरिकेवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी अमेरिकेच्या “शक्तीतून शांतता” (Peace Through Strength) या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते रक्तरंजित वास्तवाने कलंकित झाल्याचे म्हटले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी लिहिले की, निरपराध मुलींच्या मृत्यूमुळे हे धोरण किती अमानवी आहे, हे स्पष्ट झाले आहे.
लारीजानी यांनी ट्रम्प यांना उद्देशून लिहिले, “मिस्टर ट्रम्प, हीच का इराणमधील स्वातंत्र्यासाठी तुम्ही रचलेली गाणी?” असे म्हणत अमेरिकेच्या धोरणांवर दुटप्पीपणाचा आरोप केला.
दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या भूभागावर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनेई आणि इतर वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत परिस्थिती अधिक अस्थिर बनली असून जगभरात या संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.