नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच येत्या १० दिवसात जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण जाण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयात शरण येण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरण येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १० दिवसांचा मुदत दिली आहे.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र उच्च न्यायालयानेसुद्धा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालायत धाव घेतली असून याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

तसेच याप्रकरणाचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानसुद्धा पाहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी आंदोलन केले तसेच मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना म्याव-म्याव करत आवाज काढण्यात आला.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणामी नितेश राणे यांची चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version