पुणे: प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे (वय ७८) यांचे सोमवारी सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं पुण्यातील, तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी त्या होत्या. भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. सुमित्रा भावे या लहानपणापासूनचं कुशाग्र बुद्धाच्या होत्या. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळवली. शिवाय मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात देखील पदविका मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविले. त्यानंतर त्यांना त्यांची वाट घेऊन आली ही लघुपटाकडे. माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली त्यानंतर १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला.
त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’,नितळ, ‘एक कप च्या’, संहिता, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट गाजले. ‘दिठी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यांना अनेक चित्रपटांसाठी राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहे. विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे घेतले आहे. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या. पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱ्या एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.