पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात आज सकाळी झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या घटनेत हरी गंगावणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
शिरूरमध्ये गोळीबाराने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, ऐन सकाळच्या वेळी घडलेल्या या गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबाराचा आवाज होताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तातडीने शिरुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करुन तपासाला ही सुरुवात करण्यात आली आहे. घटनेशी संबंधित पुरावे आणि इतर महत्त्वाची असलेली माहिती गोळा करण्यासाठी सध्या फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
हरी गंगावणे यांच्या गोळीबाराचं गूढ कायम
हरी गंगावणे यांच्यावर नेमक्या कोणत्या कारणामुळे गोळीबार करण्यात आला आहे, याबाबत अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. गोळीबार करणारे नेमके कोण होते?,तसेच या हल्ल्यामागील कारण काय? या सर्व गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.