नीट पेपरफुटीच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली या प्रकरणी विद्यार्थ्यांचे देशव्यापी आंदोलन देखील पुकारण्यात आले होते. दरम्यान या आंदोलनाला यश मिळाले असून धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. इतकेच नव्हे तर काही आठवड्यापूर्वी ठाण्यात टीईटीचा पेपर देखील फुटल्याचं समोर आलं होतं. त्या प्रकरणातही बिहारमधून एकाला अटक करण्यात आली होती.
या सर्व घटना ताज्या असताना आता औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा आरोप करण्यात आला आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका 20 मार्चलाच व्हॉट्सॲपवर फिरल्याचा आरोप यावेळी केला गेला असून, एका विद्यार्थ्याकडे 20 मार्चलाच प्रश्नपत्रिका आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची एमपीएससीकडून निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून पेपरफुटी सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे. अहिल्यामधील ऋषिकेश गांगर्डे यांनी दावा केला आहे की, एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटली असून परीक्षेच्या दोन दिवस आधीच व्हॉट्सॲपद्वारे प्रश्न-उत्तरे पेपर देणाऱ्या काही उमेदवारांकडे पोहचली होती. पुढे गांगर्डे यांनी म्हटलं की, लोकसेवा आयोगाने 22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक या पदासाठी क्लास 2 श्रेणीसाठी पेपर घेतले होते. या परीक्षेची प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे दोन दिवस आधी म्हणजे 20 मार्च रोजी काही उमेदवारांकडे व्हॉट्सॲपद्वारे आले होते.
यावेळी व्हॉट्सॲप चॅटिंग चेक केली असताना त्यामध्ये असं म्हटलं होत की, तुम्ही 78 ते 80 प्रश्न लिहा. तर उर्वरित 10 ते 12 प्रश्न चुकीचे लिहा. दोनशेपैकी 90 प्रश्न हे पर्यायासहित अचूक आले होते. गांगर्डे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचाही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.