Stock Market Today: 2500 अंकांच्या घसरणीनंतर बाजारात उत्साह; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी ‘रिकव्हरी’, ‘हे’ आहे मुख्य कारण

सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये जोरदार वाढ दिसून आली असून कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण आणि जागतिक तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे.
Stock Market Today: 2500 अंकांच्या घसरणीनंतर बाजारात उत्साह; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी ‘रिकव्हरी’, ‘हे’ आहे मुख्य कारण

मुंबई: भारतीय शेअर बाजाराने आजच्या व्यवहाराची सुरुवात सकारात्मक वातावरणात केली असून, काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजीचे संकेत दिसू लागले आहेत. सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीकडे कल दाखवला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 352 अंकांनी वाढून 74559 वर उघडला, तर निफ्टीनेही 108 अंकांच्या वाढीसह 23110 या पातळीवर दिवसाची सुरुवात केली.

सकाळी सुमारे नऊ वाजून 25 मिनिटांपर्यंत बाजारात तेजी कायम राहिली. त्या वेळी निफ्टी सुमारे 288 अंकांच्या म्हणजेच सुमारे 1.25 टक्के वाढीसह 23291.05 या पातळीवर व्यवहार करताना दिसला. याचवेळी सेन्सेक्समध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली आणि तो जवळपास 891 अंकांनी वाढत 75000 च्या वर पोहोचला. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही सुधारणा दिसून आली असून बँक निफ्टी सुमारे 55326 च्या आसपास व्यवहार करत होता.

यापूर्वी गुरुवारी बाजारात मोठी घसरण झाली होती. 19 मार्च2026 रोजी सेन्सेक्स तब्बल 2496 अंकांनी घसरून 74207 वर बंद झाला होता, तर निफ्टी 775 अंकांच्या घसरणीसह 23002 या पातळीवर स्थिरावला होता. या मोठ्या घसरणीनंतर आजच्या सत्रात बाजारात पुन्हा खरेदीचा कल दिसत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: Rupali Chakankar : अशोक खरातांसोबतच्या फोटोमुळे आल्या अडचणीत, रुपाली चाकणकर फरार?; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ

बाजारातील आजच्या तेजीमागे काही महत्त्वाचे जागतिक घटक कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः इस्रायलने इराणच्या तेल आणि गॅस रिफायनरीजवर हल्ला करणार नसल्याचे संकेत दिल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांचा तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे जागतिक तेलपुरवठा खंडित होण्याची भीती कमी झाली असून त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.

या घडामोडीनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीतही घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रति बॅरल सुमारे 119 डॉलरपर्यंत पोहोचलेली किंमत आता घटून सुमारे 105 डॉलरपर्यंत आली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या भूमिकेमुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. कालच्या सुमारे तीन टक्के घसरणीनंतर अनेक मजबूत कंपन्यांचे शेअर्स तुलनेने स्वस्त झाले असल्याने गुंतवणूकदारांनी संधी साधत खरेदी वाढवली आहे.

दरम्यान, आशियाई शेअर बाजारात आज मिश्र वातावरण दिसून आले. जपानमध्ये राष्ट्रीय सुट्टीमुळे बाजार बंद होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुमारे एक टक्क्यांनी वाढला, तर कोस्डॅकनेही सुमारे 0.94 टक्क्यांची वाढ नोंदवली. मात्र ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX 200 निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 0.27 टक्क्यांनी घसरलेला दिसला.

अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटमध्ये मात्र 19 मार्च 2026 रोजी सौम्य घसरण झाली होती. डॉव जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.44 टक्क्यांनी घसरून 46021.43 वर बंद झाला. S&P 500 निर्देशांक 0.27 टक्क्यांनी कमी होत 6606.49 वर स्थिरावला, तर नॅस्डॅक कॉम्पोझिटही 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 22090.69 या पातळीवर बंद झाला. जागतिक बाजारातील या मिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारातील पुढील हालचालींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!

हेही वाचा: Dhananjay Munde: 'मला संपवण्यासाठी महाराष्ट्रातले 'मोठे नेते' एकवटले होते'; धनंजय मुंडेंचा भरसभेत खळबळजनक गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version