Ashadhi Wari: आषाढी वारीपूर्वी पुन्हा पेटला संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा वाद! दुसरी दिंडी रोखण्याची मागणी; नाथ वंशजांची ठाम भूमिका

आषाढी वारीपूर्वी संत एकनाथ महाराजांच्या पालखीवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून दुसरी पालखी रोखण्याची मागणी करण्यात आली असून नाथ वंशजांनी मात्र परंपरागत
Ashadhi Wari: आषाढी वारीपूर्वी पुन्हा पेटला संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा वाद! दुसरी दिंडी रोखण्याची मागणी; नाथ वंशजांची ठाम भूमिका

आषाढी वारीसाठी श्री संत एकनाथ महाराजांच्या मानाच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असतानाच पालखीच्या अधिकारावरून जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. श्री संत एकनाथ महाराज संस्थान पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथबुवा नारायणबुवा पालखीवाले गोसावी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात, श्री संत एकनाथ महाराज यांच्या नावाने पारंपरिक पालखी मार्गावरून दुसरी पालखी किंवा दिंडी काढण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या अंतिम निर्णयाचा उल्लेख करत, पारंपरिक पालखी काढण्याचा अधिकार हा केवळ रघुनाथबुवा नारायणबुवा पालखीवाले गोसावी यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, न्यायालयाचा निर्णय असतानाही त्याच नावाने दुसरी पालखी किंवा दिंडी काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संभाव्य वाद टाळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मात्र, या भूमिकेला दुसऱ्या बाजूने विरोधही करण्यात आला आहे. नाथ वंशजांनी आपली पायी दिंडी ही अनेक दशकांपासून सुरू असलेली धार्मिक परंपरा असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदाही नियोजनानुसार दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून, परंपरा खंडित होणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या दोन भिन्न भूमिकांमुळे आषाढी वारीपूर्वी पुन्हा एकदा पालखी वाद चर्चेत आला आहे. धार्मिक भावना आणि न्यायालयीन आदेश या दोन्ही मुद्द्यांमुळे प्रशासनासमोर संतुलन राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

श्री संत एकनाथ महाराजांची पालखी ही महाराष्ट्रातील मानाच्या पालख्यांपैकी एक मानली जाते. दरवर्षी हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. त्यामुळे या सोहळ्याशी संबंधित कोणताही वाद संवेदनशील मानला जातो.

सध्या जिल्हा प्रशासनाकडून संबंधित निवेदनाची दखल घेण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे वारकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version