सांगली: सांगली शहरातील गारपीर चौकात मंगळवारच्या मध्यरात्री एक हादरवणारी घटना घडली आहे. दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम जिनाप्पा मोहिते (वय 41) यांची स्वतःच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच निर्घृण हत्या करण्यात आली. हा हल्ला इतका थरकाप उडवणारा होता की, काही क्षणांतच आनंदाचे वातावरण रक्ताच्या रंगात बदलले.
माहितीनुसार, मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख आपल्या साथीदारांसह आला होता. आधी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्याने शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने स्टेजवर प्रवेश केला. पुढच्याच क्षणी त्याने धारदार हत्यार काढत मोहिते यांच्या पोटावर आणि मानेवर एकामागोमाग एक वार केले. उपस्थित लोक काही समजून घेईपर्यंत मंचावर रक्त सांडले आणि उत्तम मोहिते बेशुद्ध अवस्थेत कोसळले. क्षणातच परिसरात किंकाळ्या, गोंधळ आणि धावाधाव सुरू झाली.
समर्थकांनी आरोपींना पकडताच संतापाच्या भरात शाहरुख शेखवरच हल्ला चढवला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे. मोहिते यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येनंतर सांगली शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, गारपीर चौक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपासाची चक्रं वेगाने फिरवली आहेत.
उत्तम मोहिते हे सांगलीतील ओळखले जाणारे आणि अनेक ठिकाणी धडक आंदोलन करणारे नेते होते. त्यांच्या मृत्यूनं स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, या रक्तरंजित वाढदिवस घटनेमागील कारणांबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. पोलीस सूत्रांच्या मते, ही घटना जुने वैमनस्य आणि राजकीय वैरातून घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली शहराच्या शांततेला हादरा देणाऱ्या या खुनाने जिल्ह्यातील गुन्हेगारी जगत पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तपास सुरु असून, पोलिसांकडून आरोपींच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.