जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने पँजाब नॅशनल बँकेला गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले आहेत. 280 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार अगोदरच देण्यात आली आहे. नीरव मोदी यांची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीएनबीने सीबीआयला लूक आऊट नोटीस जारी करण्यास सांगितलं आहे.
नीरव मोदी आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली.
याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं. पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र, बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.
नीरव मोदी भारतातील मोठे हिरे व्यापारी आहेत. भारतातील ‘डायमंड किंग’ असंही समजल जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्जया जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. त्यांच्याकडे जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे. फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्यांची ‘नीरव मोदी डायमंड ब्रँड’ या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘नीरव मोदी डायमंड ब्रँड’ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. त्यांचे वडीलही हिरे व्यापारी आहे.
बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.