RCB Victory Parade: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून इतिहास रचला असला, तरी यंदा बंगळुरूमध्ये विजय मिरवणूक न काढण्याचा निर्णय फ्रँचायझीने घेतला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवल्यानंतर चाहत्यांना मोठ्या सेलिब्रेशनची अपेक्षा होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनाच्या सूचनांमुळे यंदा कोणतीही सार्वजनिक परेड होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील वर्षी आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला होता. मात्र एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यामुळे यंदा कोणताही धोका पत्करण्यास फ्रँचायझी आणि स्थानिक प्रशासन तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.
बंगळुरू पोलिसांनी आयपीएल फायनलपूर्वीच चाहत्यांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन न करण्याचे आवाहन केले होते. शहराचे पोलीस आयुक्त सीमंथ कुमार सिंह यांनी सुरक्षेच्या कारणामुळे सार्वजनिक मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आरसीबीनेही सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना जबाबदारीने आनंद साजरा करण्याचे आवाहन केले.
'हा विजय प्रत्येक आरसीबी चाहत्याचा आहे. मात्र सेलिब्रेशन करताना जबाबदारीने वागा आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करा,' असा संदेश फ्रँचायझीकडून देण्यात आला. या पोस्टनंतर विजय मिरवणूक होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले.
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या शपथविधीचा कार्यक्रमही याच काळात पार पडणार आहे. लोक भवन आणि चिन्नास्वामी स्टेडियम परिसर जवळ असल्याने एकाच वेळी मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणूनही हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय आरसीबीच्या अनेक खेळाडूंना तातडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी रवाना व्हायचे आहे. देवदत्त पडिक्कल भारतीय कसोटी संघात सहभागी होणार असून जोश हेजलवुड, टिम डेव्हिड, जेकब डफी आणि रोमॅरियो शेफर्ड यांसारख्या विदेशी खेळाडूंनाही राष्ट्रीय संघाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. त्यामुळे संघाकडे मोठ्या सेलिब्रेशनसाठी पुरेसा वेळही उपलब्ध नाही.
आरसीबीने सलग दोन हंगाम जिंकत आयपीएल इतिहासात वेगळी छाप सोडली आहे. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिलं विजेतेपद मिळवणाऱ्या संघाने आता बॅक टू बॅक ट्रॉफी जिंकून चाहत्यांना आणखी एक संस्मरणीय क्षण दिला आहे. यंदा रस्त्यावर मिरवणूक नसली तरी आरसीबी चाहत्यांसाठी हा विजय तितकाच खास आणि ऐतिहासिक मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.