Dhurandhar 2 : The Revenge : बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर 2: द रिवेंज' प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, या चित्रपटाने सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळवला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाला CBFC कडून 'A' प्रमाणपत्र मिळाले असून, त्यातील तीव्र हिंसाचार आणि थरारक ॲक्शनमुळे हा चित्रपट केवळ प्रौढ प्रेक्षकांसाठीच मर्यादित ठेवण्यात आला आहे. 2025 मधील ब्लॉकबस्टर 'धुरंधर'चा हा अधिकृत सीक्वल असून, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने आपल्या अवाढव्य कालावधीमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
232 मिनिटांचा विशाल रनटाइम
'धुरंधर: द रिवेंज' बाबतची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या चित्रपटाची लांबी. या चित्रपटाचा एकूण कालावधी 232 मिनिटे म्हणजेच 3 तास 52 मिनिटे इतका निश्चित करण्यात आला आहे. सध्याच्या काळात जिथे चित्रपट साधारण 2 ते 2.5 तासांचे असतात, तिथे सुमारे 4 तासांचा चित्रपट प्रदर्शित करणे हा एक मोठा धाडसी निर्णय मानला जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 'मेरा नाम जोकर' सारखे मोठे चित्रपट झाले असले तरी, आधुनिक चित्रपटसृष्टीच्या संदर्भात हा चित्रपट सर्वात लांब चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
'हमजा'ची भूमिका आणि सूडाची कथा
या भागात रणवीर सिंह पुन्हा एकदा त्याच्या गाजलेल्या 'हमजा' या पात्रात दिसणार आहे. पहिल्या भागात रणवीरच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते आणि आता दुसऱ्या भागात ही सूडाची कथा अधिक गडद आणि भयानक होणार आहे. आदित्य धर यांनी या सीक्वलमध्ये कथानकाला अशा वळणावर नेले आहे की, जिथे प्रेक्षकांना रोमांच उभे करणारा अनुभव मिळेल. रणवीरची जबरदस्त अॅक्शन आणि चित्रपटाचे भव्य स्केल यामुळे प्रेक्षक या 4 तासांच्या प्रवासासाठी कमालीचे उत्सुक आहेत.
ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोडले विक्रम
चित्रपटाच्या क्रेझचा अंदाज यावरूनच येतो की, याच्या प्री-बुकिंगने प्रदर्शनापूर्वीच 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यू 18 मार्चपासून सुरू होणार असून, अधिकृत जागतिक प्रदर्शन 19 मार्च 2026 रोजी होणार आहे. यामी गौतम आणि विकी कौशल यांच्या विशेष भूमिकेच्या चर्चा असतानाच, इतक्या मोठ्या कालावधीनंतरही प्रेक्षक चित्रपटगृहात खिळून राहतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.