Mohol Election : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी अढळ स्थान असलेल्या राजन पाटील यांच्या साम्राज्याला मोहोळमध्ये मोठे भगदाड पडले आहे. मात्र, दुसरीकडे आपल्या 'होम ग्राऊंड'वर म्हणजे अनगरमध्ये आपली सत्ता राखण्यात त्यांना यश आले आहे. मोहोळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या अवघ्या 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत राजन पाटलांच्या 30 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.
22 वर्षांच्या सिद्धीचा पराक्रम
मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (पाटील गट) जबरदस्त पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या विजयाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे वाणिज्य शाखेची पदवीधर सिद्धी वस्त्रे. प्रचारादरम्यान सिद्धीच्या वयावरून विरोधकांनी तिला हिणवले होते, मात्र मतदारांनी या 'नवख्या' मुलीच्या हाती सत्तेची चावी देऊन नवा इतिहास रचला. शहराचे रस्ते, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा सुधारण्याला आपले पहिले प्राधान्य असेल, असे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Congress On Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'विरोधात चव्हाणांचं वक्तव्य, पाकिस्तानला आयतं कोलीत
अनगरमध्ये प्राजक्ता पाटील 'प्रथम नागरिक'
दरम्यान, मोहोळमध्ये पराभवाचा धक्का बसला असला तरी, अनगर नगरपरिषद मात्र राजन पाटील यांनी बिनविरोध करण्यात यश मिळवले. प्रचंड कायदेशीर वादविवादानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची अनगरच्या पहिल्या नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. स्वतः राजन पाटील यांनी त्यांचे प्रमाणपत्र स्वीकारून आपल्या बालेकिल्ल्यातील पकड अद्याप कायम असल्याचे दाखवून दिले.
हेही वाचा – Nilesh Rane: कोकणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाची लॉटरी; निलेश राणेंचं शिवसेनेत 'प्रमोशन' निश्चित?
राजन पाटलांच्या वर्चस्वाला का लागले ग्रहण?
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वर्षभरातच त्यांना दुसऱ्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अनगर प्रकरणाचा फटका? अनगरमधील अर्जांच्या वादावरून झालेली राज्यव्यापी बदनामी मोहोळच्या पराभवाला कारणीभूत ठरली का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.